नगरदेवळा येथे रमजान निमित्त अल खिदमत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम – ३० दिवस रोजेदारांसाठी दररोज इफ्तार साहित्याचे मोफत वाटप

( From सैय्यद दानिश )नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून, या पावन पर्वाच्या निमित्ताने अल खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य व मानवतावादी उपक्रम राबविण्यात येत आहे. रमजानच्या संपूर्ण ३० दिवसांत रोजा ठेवणाऱ्या भाविकांसाठी दररोज सायंकाळी इफ्तारच्या वेळी विविध खाद्यपदार्थ व आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश रोजेदारांना इफ्तारच्या वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच समाजात परस्पर सहकार्य, बंधुभाव व सेवा भावनेचा संदेश देणे हा आहे. दररोज इफ्तारसाठी खजूर, फळे, पाणी, शरबत तसेच इतर आवश्यक खाद्यवस्तूंचे वाटप केले जाणार असून, गरजू व प्रवासी रोजेदारांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे सुफियान भाई, फरीद खान, सईद मिस्त्री, अनीस बागवान, सैय्यद दानिश आणि अबरार खान यांनी केले आहे. या तरुण कार्यकर्त्यांच्या टीमकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजान महिन्यात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उपक्रमाची तयारी आधीपासूनच सुरू असून, सर्व नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.
रमजान महिना संयम, त्याग, प्रार्थना आणि दानधर्माचा संदेश देणारा असल्याने या काळात गरजूंची सेवा करणे हेच खरे इबादत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. अल खिदमत फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे नगरदेवळा परिसरात सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, विविध स्तरातून या कार्याचे कौतुक होत आहे.
नगरदेवळा परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व धर्मप्रेमी व्यक्तींनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.























