सोयगावमध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ झाली उच्छादग्रस्त – नागरिक त्रस्त, अपघातांची मालिका सुरू

दत्तात्रय काटोले
सोयगाव : शहरातील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता संचार हा सोयगावकरांच्या डोक्याला मोठा त्रास ठरत आहे. विशेषतः बसस्टँड, शिवाजी चौक, जुना बाजार, वाल्मिकनगर, चित्रमंदिर परिसर या ठिकाणी जनावरांनी अक्षरशः कब्जा केला असून वाहतूक व्यवस्थेची दैना झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोकाट साडे-बैलाने गावात दहशत माजवली आहे. हा बैल बैलगाड्यांकडे झेपावत असल्यामुळे अनेकदा बैलगाड्या उलटण्याच्या घटना तोंडाशी येऊन थांबतात. लहान मुले, वृद्ध महिला आणि नागरिक यांच्यात भितीचे सावट कायम आहे. अनेकदा जनावरे महिला व मुलांवर झडप घालत असल्याने जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
वाहतूकधारकांसाठी ही परिस्थिती आणखीन धोकादायक ठरत असून मोकाट जनावरे अचानक रस्त्यावर येत असल्याने छोटे-मोठे अपघात रोजच घडत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यावर तासन्तास जनावरे बसून राहत असल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी होत आहे.
आठवडे बाजार आणखीन असुरक्षित!
मंगळवारी होणाऱ्या आठवडी बाजारात तर मोकाट जनावरांचा अक्षरशः ऊधम सुरू असतो. बाजारात दुकानात शिरणे, हातगाड्या पाडणे, नागरिकांना धडक देणे अशा घटना सातत्याने घडत असल्याने व्यापारी व ग्राहक यांच्यामध्ये संताप पसरला आहे.
यात भर म्हणजे बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर हातगाड्या व भाजीविक्रीच्या गाड्यांमुळे वाहतूक अरुंद होते. या गर्दीतच जनावरे जमा होऊन परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाते.
नागरिकांची संतप्त मागणी – “जनावरांना कोंडवाड्यात टाका!”
सोयगावकरांचे एकच मागणे – मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करा, त्यांना नोटीस द्या आणि जनावरे पकडून कोंडवाड्यात अथवा गोशाळेत जमा करा.
नगरसेवकांचा इशारा – “जनावरे पकडून गोशाळेत टाकू; न मानणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई”
या वाढत्या समस्येकडे गंभीर दखल घेत नगरसेवक हर्षल काळे, राजू दुतोंडे, अक्षय काळे आणि संतोष बोडखे यांनी कडक भूमिका घेतली आहे.
ते म्हणाले :
“उद्या नगरपंचायतीत सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला जाईल. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांना तातडीने नोटिसा दिल्या जातील. तरीही ऐकले नाही तर जनावरे सरळ गोशाळेत किंवा कोंडवाड्यात टाकण्यात येतील. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून दंडही आकारला जाईल.”
सोयगावमधील नागरिकांना आता या कारवाईकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. मोकाट जनावरांच्या त्रासामुळे उद्भवणारी अपघातांची मालिका आणि भीतीचे वातावरण कधी थांबणार? हे आगामी नगरपंचायतीच्या निर्णयावर अवलंबून आहे.

























