नराधमास फाशी द्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदन 

नराधमास फाशी द्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदन

 

 

 

(पाचोरा) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडे तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना प्रकाशात आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाजमन हादरवून टाकणाऱ्या या जघन्य कृत्याचा निषेध करत आरोपीला तात्काळ अटकेनंतर फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 

या संदर्भात पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी पाचोरा पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले. या निवेदनात अशा प्रकारचे पाशवी अपराध करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा न झाल्यास समाजात भीतीचे वातावरण निर्माण होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. फाशीची शिक्षा दिल्यास अशा घटनांना मोठा प्रतिबंध बसेल, असे मत प्रतिनिधींनी व्यक्त केले.

 

निवेदन सादर करतांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, राज्य उपाध्यक्ष, राकेश सुतार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, कुंदन बेलदार, पाचोरा शहर अध्यक्ष (इलेक्ट्रॉनिक मीडिया) छोटू सोनवणे, पाचोरा शहर अध्यक्ष, स्वप्निल कुमावत, पाचोरा तालुका अध्यक्ष, गौतम सोनवणे, पाचोरा तालुका उपाध्यक्ष, अन्वर शेख, पाचोरा शहर उपाध्यक्ष (इलेक्ट्रॉनिक मीडिया), दिलीप जैन, निलेश पाटील, फिरोज देशमुख, शरद पाटील उपस्थित होते.

 

या अमानुष घटनेमुळे जिल्ह्यात तसेच राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांकडूनही मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून आरोपीवर कठोर कारवाईची प्रक्रिया गतीमान करण्यात येत असल्याचे समजते.