शिवसेनेचे धरणे आंदोलन : शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व प्रति हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
दत्तात्रय काटोले सोयगाव (प्रतिनिधी) :
यंदाच्या अतिवृष्टीने सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीची जमीन वाहून गेली, विहिरी जमीनदोस्त झाल्या आणि जनावरांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी आणि प्रति हेक्टरी ₹५० हजार मदतीची घोषणा करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि. ९) सोयगाव तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुकाप्रमुख दिलीप मचे यांच्या अध्यक्षतेखाली हा हंबरडा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी शेकडो शेतकरी, शिवसेना पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी ‘शेतकऱ्यांना न्याय द्या’, ‘कर्जमाफी तात्काळ लागू करा’ अशा घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कर्जमाफी जाहीर करण्यात यावी.