आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश : जरंडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश : जरंडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

 

 

सोयगाव प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

सोयगाव, दि. ८ तालुक्यातील जरंडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ भव्य पुतळा उभारण्यास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे आमदार अब्दुल सत्तार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला असून, अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्णत्वास जात आहे.

 

विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार सत्तार यांनी या पुतळ्यासाठी आवश्यक ती शासकीय मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आज हा पुतळा उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

 

या निर्णयामुळे जरंडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवप्रेमींनी आमदार सत्तार यांचे विशेष आभार मानले आहेत. पुतळा उभारणीसाठी लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याचे समजते.

 

दरम्यान, सोयगाव तालुक्यातील मोलखेडा व डाभा गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ पुतळे तसेच घाणेगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठीही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांवरही आमदार सत्तार सातत्याने पाठपुरावा करत असून, लवकरच त्यालाही मंजुरी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.