जनावर चोरी व अवैध कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश — ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक

जनावर चोरी व अवैध कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश — ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक

 

छत्रपती संभाजीनगर, दि. 21 सप्टेंबर दत्तात्रय काटोल

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनावर चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असून, नुकत्याच झालेल्या कारवाईत अवैध कत्तल व मांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

 

दि. 20 सप्टेंबर रोजी कन्नड शहरातील जिओ पेट्रोल पंपाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये चोरलेली जनावरे कापली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तातडीने कन्नड शहर व वडोदबाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने रात्री ९ वाजता छापा टाकला.

 

या कारवाईदरम्यान पोलिसांना अवैध स्लॉटर हाऊस आढळले, जिथे १० नुकतीच कापलेली गोवंश जनावरे आणि ४८ जिवंत जनावरे मिळून एकूण ५८ जनावरे सापडली. घटनास्थळी बोलेरो पिकअप, एर्टिगा कार, चार मोटारसायकली, कत्तलीसाठीचे साहित्य व रोख रक्कम असा मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

यावेळी सय्यद अलताफ सय्यद फकीर (रा. इंदिरानगर, कन्नड) याला अटक करण्यात आली. त्याने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात अनेक जनावर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध वडोदबाजार, बदनापूर, धाड आणि जाफ्राबाद पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांची माहिती समोर आली असून, १० ते १५ चोरीच्या घटनांमध्ये सहभागाची कबुली त्याने दिली आहे.

 

सदर प्रकरणात अजून ९ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या जिवंत जनावरांची व मांसाची कायदेशीर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया कन्नड शहर पोलिसांकडून सुरू आहे.

 

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड आणि मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा, कन्नड शहर व वडोदबाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

 

पोलीस विभागाच्या या योजनाबद्ध आणि तत्पर कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये नव्याने विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुढील तपास कन्नड शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.