नमो महारोजगार मेळाव्यात विदर्भातील युवकांना करिअर घडवण्याची संधी

नमो महारोजगार मेळाव्यात विदर्भातील युवकांना करिअर घडवण्याची संधी

– ३८ हजार ८०० तरुणांनी केली ऑनलाइन नोंदणी

नागपूर, 6 डिसेंबर 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या मार्फत येत्या दिनांक 9 आणि 10 डिसेंबरला जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे भव्य असा नमो महारोजगार मेळावा आयोजित आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नागपूरसह विदर्भातील ३८ हजार ८०० तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नागपूरसह विदर्भातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनस्पॉट नोंदणीसाठी ५० हून अधिक स्टॉल राहणार आहेत.

या मेळाव्यात कुशल – अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक / अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच किमान 10, 12 वी पास – नापास तसेच पदविका, पदवी – पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात येईल या मेळाव्यात देशभरातील नामांकित 300 हून अधिक कंपन्या येथे रोजगार देण्याच्या दृष्टीने उपस्थित राहणार आहेत. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी या मेळाव्यात सहभागी होऊन विदर्भातील युवक-युवतींनी आपले करिअर घडवण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.