पाचोरा शेतकरी सहकारी संघाच्या जागेची बेकायदेशीर विक्री अमोल शिंदे यांचा पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट

पाचोरा शेतकरी सहकारी संघाच्या जागेची बेकायदेशीर विक्री अमोल शिंदे यांचा पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट

पाचोरा—
येथील शेतकरी सहकारी संघाच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना तसेच सदर जागेबाबत पाचोरा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना येथील काही राजकीय व्यक्तींनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी न्यायालयाचा अवमान व सहकार नियम आणि कायद्याची पायमल्ली केली आहे. शेतकरी संघाच्या संचालक मंडळाला अंधारात ठेवत बेकायदेशीर त्रिसदस्यीय समितीने काही राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने संघाची करोडो रुपयांची मालमत्ता एका खाजगी बिल्डरला कवडीमोल भावात विकण्याचे भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी म्हटले आहे.

पाचोरा तालुका शेतकरी संघाच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. जागेच्या मूळ मालकाने दावा नंबर 06 /2004 नुसार जागेबाबत मनाई हुकूम मिळवला आहे. असे असताना निवडक संचालकांच्या बेकायदेशीर त्रिसदस्यीय समितीने एका खाजगी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीला परस्पर जागेची विक्री केली आहे.पाचोरा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील सुमारे 30 कोटी रुपयांची जागा अवघ्या 3 कोटी 71 लाख च्या कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.

वास्तविक पाचोरा शेतकरी संघाच्या वादग्रस्त जागेसंदर्भात “लीज अँड होल्ड” बाबत पाचोरा न्यायालयाचा “मनाई हुकूम कायम” असताना निवडक संचालकांनी संगनमत करून जळगाव कोर्टात स्पे.मु.नं 184/ 2022 दाखल केला, व या दाव्याच्या आधारे सेटलमेंट दाखवण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी मूळ मालक व शेतकरी संघाचे जागरूक संचालक सतीष बापू शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. स्पेशल दावा नंबर 184 /2022 अन्वये हस्तक्षेप नोंदवून संबंधितांनी जागेचा गैरव्यवहार करताना लपवलेल्या बाबी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्या आहेत.

शेतकरी संघातील बेकायदेशीर त्रिसदस्य समितीने संचालक मंडळाची परवानगी न घेता, सहकार नियमानुसार ठराव मंजूर न करता,न्याय प्रविष्ट व विवादित जागेची स्वतःच्या स्वार्थासाठी बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संचालक सतीश बापू शिंदे यांनी हा गैरव्यवहार सहकार न्यायालयात व या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

31 जुलै रोजी जागेच्या मूळ मालकाने नोंदवलेल्या तथ्याच्या आधारावर पाचोरा न्यायालयाने मनाई हुकूमाचा निर्देश पुनश्च एकदा अधोरेखित केला आहे. परिणामी गैरव्यवहार करणारी त्रिसदस्य टोळी आपले पाप लपवण्यासाठी धावपळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. आपला गुन्हा लपवण्यासाठी संबंधितांनी सहकार कायदा, नियमावली,संचालक मंडळाचे अधिकार यांच्या निर्देशाचे पालन न करता शेतकरी संघासाठी परस्पर नवीन जागा खरेदी केल्याचा प्रताप सुद्धा समोर आला आहे. विशेष म्हणजे पाचोरा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील करोडो रुपयांची जागा कवडीमोल भावात विक्री करून शहरापासून दूरवर असलेल्या शेत जमिनीला करोडो रुपयात विकत घेतल्याचा अजब प्रकार पाचोऱ्यात घडला आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संस्था गिळंकृत करणारे काही राजकीय नेते या गौडबंगालचे सूत्रधार असल्याचे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या वैभवशाली परंपरेने सुप्रसिद्ध असलेला पाचोरा शेतकरी संघ सध्या मृत्यूशयेवर आहे. सत्तालोलूप त्रिसदस्यीय समिती आणि त्यांच्या भ्रष्टासुर नेतृत्वाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या प्रकाराकडे स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्था एकापाठोपाठ एक गिळण्याचा प्रकार येथील काही राजकीय व्यक्ती कायम करीत आहे. अत्यंत सुप्त पद्धतीने संस्थांची शिकार करणाऱ्याला स्थानिक आमदाराचा राजाश्रय असल्याची चर्चा पचोर्‍यात आहे.

शेतकऱ्यांच्या संस्थेची विल्हेवाट लागत असताना शेतकरी हिताच्या पोकळ गप्पा मारणारे आमदार याप्रकरणी गप्प कसे..? या प्रकाराकडे आमदार किशोर पाटील यांचे दुर्लक्ष म्हणजे भ्रष्टाचाराला मूकसंमती समजावी का..? झालेल्या गंभीर प्रकाराबाबत आमदार किशोर पाटील यांनी तत्परतेने दखल घेऊन शेतकरी व शेतकऱ्यांच्या संस्थेला न्याय मिळवून द्यावा असे आव्हान अमोल भाऊ शिंदे यांनी केले आहे. मात्र याप्रकरणी आमदार भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर,शेतकरी संघाचे संचालक सतीश बापू शिंदे हे कायदेशीर व सनदशीर मार्गाने लढा देऊन शेतकरी संघाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.