विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा! – प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा! – प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर

पाचोरा दि. 13 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स ॲण्ड के. के. सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथील प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विज्ञान शाखा खूप व्यापक आहे. त्यातून मूठभर ज्ञान घेतले तरी विद्यार्थी चांगली पदवी घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. शेतीतही आधुनिक तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल होत आहेत, त्या अमुलाग्र बदलात भर घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून संशोधन केले पाहिजे. पदवीत विज्ञानाचा विषय निवडताना मेंढरांच्या ओळीसारखे न जाता आपल्याला आवड व रूची असेल असाच विषय निवडून विज्ञानाची पदवी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी विज्ञानाच्या वेगवेगळ्या उदाहरणांमधून विज्ञान शाखेची व्यापकता विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यांनी ग्येयीलिओ, कोल्ट, थॉमस एडिसन, न्यूटन व व्होल्ट या शास्त्रज्ञांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जागृत केली. तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एस. टी. सूर्यवंशी यांनी विज्ञान मंडळाची आवश्यकता व कार्य यावर प्रकाश टाकला.
यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील हे विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शरद पाटील, प्रा. अमित गायकवाड, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा शिरोळे व आभार प्रदर्शन प्रा. अतुल पाटील यांनी केले.