नगरदेवळाच्या सुपुत्राचा उद्योग भूषण म्हणून गौरव

नगरदेवळाच्या सुपुत्राचा उद्योग भूषण म्हणून गौरव

पाचोरा- (प्रतिनिधी)
नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार पवार परिवारातील ज्येष्ठ सुपुत्र तथा पुणे येथील युवा उद्योजक अर्जुन दिग्विजयराव पवार यास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते “उद्योग भूषण” म्हणून गौरवण्यात आले.

दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी कोल्हापूरच्या सयाजी हॉटेलमध्ये झालेल्या एका विशेष समारंभात सन्माना चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरवण्यात आले.

नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार तथा जळगाव जि.प. चे माजी उपाध्यक्ष कै.बाळासाहेब के. एस. पवार यांचे नातू आणि माजी जि. प सदस्या वंदनाताई दिग्विजय पवार यांचे सुपुत्र अर्जुन पवार यांनी उद्योग क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. अर्जुन पवार हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून निकोल ई.व्ही. कंपनीचे ते संचालक आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग उपकरणांची निर्मिती, उभारणी व व्यवस्थापन या क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरच्या समारंभात युवा उद्योजक गटात उद्योग भूषण उपाधीने त्यांना गौरवण्यात आले.
अर्जुन पवार यांचा गौरव युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खानदेशातील ऐतिहासिक नगरदेवळा गावातील पवार जहागीरदार परिवाराचा व खानदेशचा गौरव होत असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.