निश्चित केलेल्या भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारल्यास तक्रार करा

निश्चित केलेल्या भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारल्यास तक्रार करा

जळगाव, दि. 16 :- खाजगी वाहतूकदारांनी स्पर्धात्मक वातावरणात वाजवी भाडे आकारुन प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तथापि, गर्दीच्या हंगामात मागणी पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होवू नये याउद्देशाने कमाल भाडे निश्चित करण्यात आलेले आहे. कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबधित परवानाधारक वाहतूकदाराविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.
जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन दिला असून प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याबाबतचा फलक लावण्याची सूचनाही दिली आहे. तसेच कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणीची विशेष मोहिम 16 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या येणा-या भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर गृह विभागाने 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स यांनी शासन निर्णयानुसार आकारावयाचे महत्तम प्रति प्रवासी, प्रति किमी दर-नॉन एसी सिटर (निमआराम)-2.56 रुपये, एसी सिटर-4.62 रुपये, नॉन एसी स्लिपर-2.95 रुपये, एसी स्लिपर-5.49 रुपये असे आहेत. त्यानुसार पुणेसाठी अनुक्रमे-999, 1803, 1150, 2141, मुंबईकरीता-1101, 1987, 1268, 2361, नागपूरकरीता-1123, 2033, 1298, 2416, अहमदाबादकरीता-1485, 2380, 1711, 3184, इंदौरकरीता-794, 1432, 914, 1702 तर सुरतकरीता-794, 1478, 944, 1757 याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहे.
कोणत्याही खाजगी वाहतूकदाराने (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास याबाबतची तक्रार dyrto.19-mh@gov.in व dycommr.enf2@gmail.com या संकेतस्थळावर करावी. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.