‘स्टार्ट-अप’बाबत बोलू काही…
– आ. सत्यजीत तांबे यांनी जाणून घेतला नवउद्योजकांचा प्रवास
– जळगाव दौऱ्यात घेतली युवा नवउद्यमींची भेट
प्रतिनिधी, जळगाव
नोकरीच्या सरळधोप मार्गाऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या नवउद्यमींसमोर असलेली आव्हाने, या युवा उद्योजकांचा प्रवास, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या डोक्यातील भन्नाट संकल्पना अशा अनेक गोष्टींबाबत तरुणांची नस ओळखणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी युवा उद्योजकांसोबत दिलखुलास चर्चा केली. निमित्त होतं जळगाव दौऱ्यावेळी या नवउद्यमींसोबत झालेल्या भेटीचं! या वेळी स्टार्ट-अप्ससाठी जळगाव जिल्ह्यात पोषक वातावरण तयार करण्याबाबतही विचारविनिमय झाला.
जळगावमध्ये कशा पद्धतीने स्टार्टअप इकोसिस्टीम सुरू करू शकतो. कोणत्या नवीन गोष्टी करून उद्योग मोठा करू शकतो, याबाबत चर्चा झाली. तसेच उद्योगामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात. त्यावर कशा पद्धतीने मात करू शकतो, यावर देखील सखोल चर्चा झाली, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
युवकांसाठी सदैव तत्पर असणारे आ. सत्यजीत तांबे यांनी जळगाव येथे युवा उद्योजकांची भेट घेतली. शनिवारी आ. तांबे जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी युवा उद्योजक एकाच छताखाली एकवटले होते. युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती असेल तर तिने उद्योग उभा करून संपत्ती मिळवावी, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तेव्हाच ‘युवा उद्योजकांचा देश’ म्हणून भारताची नवी ओळख निर्माण होईल. परंतु त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे भाष्य आमदार सत्यजीत तांबेंनी केले.
सध्याचे असंख्य युवा हे सरकारी नोकरीकडे वळतात. उद्योजकामध्ये अनेक युवकांना रोजगार देण्याची क्षमता असते. शहर व ग्रामीण भागात उद्योजकांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. युवकांनी उद्योगांच्या संधीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण उद्योग क्षेत्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. उद्योग वाढवण्यासाठी तरुणांनी समाज माध्यम, ऑनलाइन वेबसाईट व जाहिरात इत्यादी मार्गांचा वापर करावा, असाही सल्ला आमदार सत्यजीत तांबेंनी युवा उद्योजकांना मार्गदर्शन करताना दिला.