देवरुप परिवारात “रंधा” चे आगमन : प्रा.बी.एन.चौधरी यांच रंधा बद्दल मनोगत

देवरुप परिवारात “रंधा” चे आगमन :
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
आज “देवरुप” परिवारात आलेली डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची “रंधा” ही कादंबरी विचारांना चालना देवून गेली. सुतारकाम, मेस्त्रीकाम करणारे कारागीर म्हणजे ग्रामीण भागातले सुतारकामाचे डॉक्टरच. त्यांचं महत्वाचं औजार म्हणजे “रंधा”. जो लाकडाचं बेढबपण काढून त्याला सरळ करतो. त्यावरील पापुद्रा काढून चकचकीत करतो.
नुकतच वापी येथे अहिराणी संमेलन संपन्न झाले. त्यात संमेलनाध्यक्ष डॉ. रमेशजी सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात लोकवाङ्मय आणि लोकसाहित्य यावर एक महत्वपूर्ण मत प्रदर्शित केलं. लोकवाङ्मयात आपण साहित्य म्हणून रचनांचा अभ्यास करतो. मात्र, त्यात येणाऱ्या साहित्याबद्दल (वस्तू, औजारं, भांडी, मापं, इ.)फारसं बोलत नाहीत. त्यांची रचना, त्यांचं कार्य, उपयोग संकलित करत नाहीत. ही दुरावस्था वाढत राहिली तर पुढच्या पिढीला जुन्या वस्तू समजणारच नाहीत. हे मनाला पटलं.
भाऊसाहेबांनीही आपल्या मनातील असंख्य आठवणींना या कादंबरीच्या माध्यमातून एका रेषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जुनी पुटं बाजूला करुन त्यांना चकचकीत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कादंबरीला दिलेलं नाव किती समर्पक आहे ते पटलं. शिवाय आपल्या कर्म औजारांना समाजमनावर बिंबवण्याचा याहून सुंदर योग कोणता असू शकतो. या निमित्ताने लोकसाहित्यालाच उजाळा दिला जाणार आहे.गावगाड्यातील जनजीवन आणि तेथील कर्मयोग्याचे औजाराचे चिंतनही यात आले आहे.
कादंबरी हातात आल्याआल्या तिनं मनाचा ताबा घेतला. वाचल्यावर त्यातून बरचसं सकस हाती लागेल याची खात्री आहे. कारण भाऊसाहेब आणि मी एकाच वाटेवर चालणारे वारकरी आहोत. साहित्याची पताका खांद्यावर घेवून, शब्दनाद करत आनंदाच्या शोधात निघालो आहोत. भाऊसाहेब हा शब्द-ऐवज दमदार आहे. कादंबरी वाचल्यावर सविस्तर संवाद साधेलच. तोवर राम कृष्ण हरी.!

© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)

|| रंधा ||
लेखक :- डॉ.भाऊसाहेब मिस्तरी
प्रकाशन :- शब्दान्वय, मुंबई
किंमत :- ₹ ३०० /-
पाने :- २२३
घरपोच कादंबरी मिळवण्यासाठी
संपर्क , फोन पे नंबर :
9321773163
प्रभाकर पवार