पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक भरती नियमबाह्य, चौकशी व्हावी किशोर गरुड यांची मागणी.

पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक भरती नियमबाह्य, चौकशी व्हावी किशोर गरुड यांची मागणी.

सद्यस्थितीत महाराष्ट्रात सगळीकडे बोगस शिक्षक भरती घोटाळा गाजत असून तशी जिल्हानिहाय आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरु झाली असल्याचे बोलले जाते. अशीच बोगस शिक्षक भरती पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात झाली असल्याची तक्रार पिंपळगाव हरेश्वर येथील मा. श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित ग्रामविकास विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सन २०२० ते सन. २०२१ या कालावधीत शासनाचे नियम धाब्यावर बसवून शिक्षक भरती बंद असल्यावरही नियमबाह्य शिक्षक भरती करण्यात आली आहे. अशी तक्रार संस्थेचे सभासद पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी मा. श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हापरिषद जळगाव व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडे लेखी स्वरुपात केली असून सदर तक्रारी निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड, राज्य शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री. बच्चूभाऊ कडू, शिक्षण उपसंचालक, अध्यक्ष तपासणी पथक नाशिक व औरंगाबाद यांच्याकडे पाठवल्या आहेत.
या तक्रारी निवेदनात मा. श्री. किशोर भिकनराव गरुड व इतर ग्रामस्थ सभासदांनी म्हटले आहे की पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळात प्रत्यक्षात शिक्षक भरती ग्रामविकास मंडळ संचलीत प्राथमिक व माध्यमिक येथे सन २०२० व २०२१ या शैक्षणिक वर्षात २० ते २३ शिक्षकांची (लोकांची) भरती करण्यात आली असून काही शिक्षकांचे अप्रुव्हल अनधिकृत शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक देवाणघेवाण करत स्वताच्या अशिर्वादाने काढून शिक्षक भरती केली आहे.
तसेच शासनाचे भरतीसंदर्भात कुठलेच आदेश नसतांना सन २०१७ सालाची भरती दाखवण्यात आली आहे. व तसे प्रस्ताव देखील पाठवण्यात आले आहेत. व ते मान्य देखील करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात सन २०२१ ला त्या शिक्षकांना हजर करण्यात आले आहे. जर संबंधित शिक्षकांची २०२१ ची भरती दाखवून २०२१ लाच हजर करण्यात येत असेल तर त्या शिक्षकाचे रोस्टर टाइमटेबल, कँटलॉग विषयांचे प्रशिक्षण, निवडणूक दिवट्या कुठे लावण्यात आल्या होत्या तसेच या शिक्षकांचे पाठटाचण किंवा मस्टरवरील सह्या असतील तर त्या अशा बऱ्याचशा झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबी चौकशीअंती समोर येतील व या चौकशीत शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी यांनी नक्कीच आर्थिक देवाणघेवाण करुन नियमबाह्य अधिकाराने शिक्षक भरती झाली असल्याचे नमूद केले आहे.
कारण हि शिक्षक भरती शासनातर्फे शिक्षक भरती बंद केलेली असतांना या भरती बंदच्या कालावधी शिक्षक भरती झालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच समजा जर ही शिक्षक भरती नियमानुसार करण्यात आली असेल तर शिक्षक भरतीची रीतसर प्रक्रिया करतांना शिक्षक भरतीसाठी नामांकित व जास्त खपाच्या व खेडोपाडी जाणाऱ्या दैनिकात जाहीर निविदा (जाहिरात) देणे क्रमप्राप्त असतांनाही अशी कोणतीही जाहिरात देण्यात आलेली नाही किंवा कुठेही आढळून आलेली नाही असा आरोप तक्रारदारांनी केला असून तशी जाहिरात दिली असल्यास तसे जाहिरातीचे बिल (पावती) संस्थेच्या संचालकांनी दाखवावी अशी मागणी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे संबंधित शिक्षक भरती करतांना मुलाखती घेण्यात आल्या का? मुलाखती घेण्यात आल्या असतील तर किती उमेदवार हजर होते. या शिक्षक भरतीसाठी संस्थेकडे किती अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारापैकी किती इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, मुलाखती घेतांना किंवा घेतल्यानंतर गुणवत्तेचे निकष कशाच्या आधारावर लावण्यात आले. तसेच ह्या मुलाखती घेतांना तज्ञ व अभ्यासू परिक्षक तेथे हजर होते का ? या सर्व बाबी समोर येणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे या संस्थेवर कार्यरत असलेल्या मंडळाचा कार्यकाळ संपलेला असतांना रितसर वेळेवर निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळ निवडणे क्रमप्राप्त असतांना शासनाच्या नियमांचे पालन न करता मुदतबाह्य झालेल्या संचालक मंडळाने शिक्षक भरती करणे हे कोणत्या अधिकारात आहे हे तपासणे गरजेचे आहे. कारण या संचालक मंडळाने आपपल्या कुटूंबातील, रक्ताच्या नात्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीला लावण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करुन पैसे कमावण्याचा एकमेव उददेश डोळ्यासमोर ठेवून ही शिक्षक भरती केली असल्याचे आरोप मा. श्री. किशोर गरुड यांनी तक्रारी निवेदनात केला आहे.
तसेच शिक्षक भरती करतांना नितीमत्ता गहाण ठेवून शिक्षण भरती करण्यात आली आहे असे नमूद करत शिक्षक पात्रता (T.E.T.) परिक्षा पास नाहीत या विषयावर मंडळाला विचारणा केली असता तुमच्याकडून जे होईल ते करा अशा अरेरावी व अर्वाच्य भाषेचा वापर करुन तक्रारदारांना हाकलून लावल्याचे सांगितले जाते. ही नियमबाह्य व बोगस शिक्षक भरती झाल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक भार पडत असून शिक्षक भरती ही ज्या ज्या विषयाचे शिक्षक भरती करायला पाहिजे होते त्याप्रमाणे शिक्षक भरती न करता तसेच गुणवत्तेनुसार शिक्षकांची निवड न करता फक्त आणि फक्त नातलगांचा गोतावळ्यातील व रक्ताच्या नात्यातील लोकांची भरती करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होऊन शैक्षणिक नुकसान होत आहे.
या शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ दोन वर्षापासून संपलेला असल्यावर सुद्धा शासनाचे नियम न पाळता निवडणूक न घेता गैर प्रकारे शिक्षक भरती करण्यात आली असल्याचे मत व्यक्त करत या संचालक मंडळाला कार्यमुक्त करत या गैरप्रकारे व गैरमार्गाने झालेल्या शिक्षक भरतीची निपक्ष चौकशी होऊ संबंधित संचालक मंडळावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच या नियमबाह्य झालेल्या शिक्षक भरतीची चौकशी होऊन संपूर्ण गैरप्रकराची चौकशी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती तक्रारदार मा. श्री. किशोर गरुड यांनी दिली असून या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण मंत्री, मा. राज्य शिक्षण मंत्री, मा. मुख्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार तसेच शिक्षण उपसंचालक अध्यक्ष तपासणी पथक नाशिक औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून मा. श्री. किशोर गरुड हे लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे आर.डी.आर.न्यूजला कागदपत्रे व तक्रारी अर्ज दाखवत पुराव्यानिशी सांगितले आहे.