विद्यार्थ्यांवर सुसंस्कार टाकण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते – श्री.नानासाहेब व्ही. टी. जो

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार टाकण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते – श्री.नानासाहेब व्ही. टी. जोशी

पाचोरा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर उत्साहात संपन्न

*पाचोरा दि. 15 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे ‘विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर’ वाघुलखेडा गावात उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी होते. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले की, अशा श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर संस्कार टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाचा असतो. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचे कार्य अशा शिबिरांच्या माध्यमातून केले जाते. वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी अनेक शिबिरे होतात, परंतु त्या सर्वच शिबिरांपेक्षा हे शिबीर वेगळेच असते. कारण या शिबिरात श्रमाच्या माध्यमातून संस्कार देण्याचे कार्य केले जाते, आपल्या घरापासून आठवडाभर दूर राहून समाजाशी नाळ जोडली जाते, ग्रामीण भागात पावलोपावली येणाऱ्या अडचणींना इथला माणूस कशा प्रकारे सामोरा जातो याची जाणीव करून दिली जाते. अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यापूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. वाय. बी. पुरी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पूर्ण आठवडाभर केलेल्या कार्याचा आढावा मांडला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थी समाजाचे देणे लागतो. त्याच्यावर समाजातील उत्तम संस्कार घडावेत यासाठी अशा विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या सात दिवसांमध्ये मी तुम्हाला जवळून पाहतो आहे. त्यामध्ये मला तुमच्यातील प्रचंड वाढलेला आत्मविश्वास दिसतो. तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देणारे हे एक व्यासपीठ आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त जागृत करण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, दलाई लामा हे जसे आपल्या कवितेत माणूस शोधत आहेत. तसा सुसंस्कृत माणूस घडविण्याचे कार्य ह्या श्रमसंस्कार शिबिराने तुमच्यावर केले आहे असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या संपूर्ण शिबिरात दि. 07 मार्च ते 13 मार्चपर्यंत बौद्धिक सत्रांमध्ये विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. त्यात पहिल्या दिवशी ‘समाज सुधारकांचे योगदान’ आणि ‘मूल्य शिक्षण’ या विषयांवर अनुक्रमे डॉ. अतुल सूर्यवंशी व श्री. बी. एस. पाटील, दुसऱ्या दिवशी ‘आपले आरोग्य आपल्या हातात’ आणि ‘साहित्य और समाज’ या विषयांवर डॉ. संजय माळी व प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, तिसऱ्या दिवशी ‘कोरोना व आरोग्याची काळजी’ आणि ‘डोळ्यांचे आरोग्य व निगा’ या विषयांवर डॉ. संदेश सोनवणे व डॉ. बाळकृष्ण पाटील, चौथ्या दिवशी ‘राष्ट्रीय सेवा योजना व स्वयंसेवक’ आणि ‘जाती मुक्त भारत’ या विषयांवर डॉ. एस. बी. तडवी व प्रा. के. एस. इंगळे, पाचव्या दिवशी ‘आपत्ती व्यवस्थापन’ आणि ‘साहित्य व सामाजिक दृष्टिकोन’ या विषयांवर डॉ. पंकज शिंदे व प्रा. स्वप्नील भोसले, सहाव्या दिवशी ‘ग्राहक चळवळ कायदा’ आणि ‘बँकिंग क्षेत्रातील आधुनिक प्रवृत्ती’ या विषयांवर डॉ. सचिन हाडोळतीकर व डॉ. बी. एस. भालेराव यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासोबतच दररोज सकाळ सत्रामध्ये व्यायाम आणि योगासने, ग्रामस्वच्छता अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, स्त्री भ्रूणहत्या जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती, हागणदारी मुक्त ग्राम अभियान, कोरोना चाचणी व त्यावरील अहवाल अशा सुप्त उपक्रमांचे आयोजन या सात दिवसात करण्यात आले. या शिबिराला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी ‘समाज व विद्यार्थी’ या विषयावर विशेष मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमाप्रसंगी श्री. उज्वल पाटील यांनी गावाला दिलेल्या योगदानाबद्दल शिबिराच्या संयोजकांचे आभार मानले. यावेळी वाघुलखेड्याचे सरपंच श्री. दिनकर पाटील, श्री. फकीरा पाटील, श्री. शंकर पाटील, श्री. संजय पाटील, श्री. साहेबराव पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. माणिक पाटील, प्रा. श्रीमती प्राजक्ता शितोळे, प्रा. गिरीशचंद्र पाटील, श्री. मच्छिंद्र पाटील, श्री. उमेश माळी, श्री. सागर शर्मा व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. स्वप्नील भोसले तर आभारप्रदर्शन प्रा. आर. बी. वळवी यांनी मांडले. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी व शिबिरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.