सत्ताधुंद आमदाराला झोपेतून जागवण्यासाठी पाचोऱ्यात भाजपाचे ढोल बजाओ आंदोलन

सत्ताधुंद आमदाराला झोपेतून जागवण्यासाठी पाचोऱ्यात भाजपाचे ढोल बजाओ आंदोलन

पाचोरा-
सत्ताधुंद आमदाराला सत्तेच्या झोपेतून जागविण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भाजपा किसान मोर्चा तर्फे पाचोरा शहरात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. आज दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झालेल्या या ढोल बजाओ आंदोलनात पाचोरा -भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महावितरणाच्या आडमुठ्ठे धोरणामुळे होरपळलेल्या बळीराजासाठी भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव तर्फे एकत्र येऊन सत्ताधुंद राज्य सरकार सह स्थानिक आमदारांना जागवण्यासाठी आयोजित केलेला हा महाएल्गार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.शेतकरी बांधवांना ऐन रब्बी हंगामात वारंवार महावितरण कडून भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यां विरोधात हे लक्षवेधी आंदोलन होते. पाचोरा भडगाव तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली अटल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय पासून घोषणाबाजी करीत छ.शिवाजी महाराज चौकात जाऊन या नाकर्ते सरकारच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन केले ,

१)ट्रान्सफार्मर (डी.पी.)वरून होणारी वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी,
२)कृषिपंपांचा वीजपुरवठा ८ तास नियमित व योग्य दाबाने अखंडित देण्यात यावा,
३)नादुरुस्त ट्रान्सफार्मर डी.पी. ४८ तासांत दुरुस्त करून देण्यात यावी.
४)जुलमी पद्धतीने होणारी वीज बिल वसुली तात्काळ थांबावी,

यासह शेतकरी हिताच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भाजपाने हे ढोल बजाओ आंदोलन पाचोरा शहरात केले.
प्रचंड मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांचा गगनभेदी आवाज, सरकार विरोधी कानठळ्या बसवणाऱ्या घोषणा व सहभागी शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यांच्या टाळ्या आणि आरोळ्यांनी शहर दुमदुमून गेले. ऐन दुपारी मार्च महिन्याच्या उन्हात सुद्धा हजारो शेतकऱ्यांनी एकत्र जमून हे आंदोलन यशस्वी केले. मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा केलेला छळ लक्षात घेता उपस्थित शेतकऱ्यांचा आक्रोश व संतप्त भावना यांना भारतीय जनता पार्टीने वाट मोकळी करून दिल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्यांच्या दुःखाची आर्त हाक या सत्ताधारी आमदारांच्या कुंभकर्णी कानापर्यंत पोहोचण्यासाठी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला.

यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर मोर्चात संबोधित करताना पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर शरसंधान साधत ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झालेत त्या शेतकऱ्यांनाच आमदारांनी वाऱ्यावर सोडले असुन आमदारांकडून जर शेतकऱ्यांच्या जर समस्या सुटत नसतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली तसेच आमदारांना फक्त टक्केवारी मिळत असलेल्या विकास कामांमध्ये फक्त रस असून शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या मूलभूत सोयी-सुविधा व समस्यांवर आमदार स्पष्टपणे दुर्लक्ष करीत आहेत. व ते फक्त ठेकेदार मित्रांचे आमदार नसून सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांची देखील आमदार आहेत हे देखील भान त्यांनी ठेवावे असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील स्थानिक आमदारांसह राज्य शासनावर जोरदार टीका केली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि युवा मोर्चा ते सर्व पदाधिकारी तथा पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.