पाचोरा तालुक्यातील गोरारखेडा येथे जि.प मराठी व उर्दू शाळेत धाडसी चोरी

पाचोरा तालुक्यातील गोरारखेडा येथे जि.प मराठी व उर्दू शाळेत धाडसी चोरी

 

गोरारखेडा जि प मराठी व उर्दू शाळेत धाडसी चोरी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत तर उर्दू माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. या शाळेत दि.६ रोजी रात्रीच्या सुमारास शाळेत धाडसी चोरीचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.६ रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शाळेच्या परिसरालगत असलेल्या शेतामध्ये भरणा करणारे शेतकरी इंद्रभान पाटील, बारकू पाटील, आदींना शाळेतून मोठ मोठ्याने आवाज ऐकू आला. सुरुवातीस शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ठराविक वेळाने वारंवार आवाज ऐकू येत असल्याने चार ते पाच शेतकरी जमा होऊन शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोहोचले त्यांनी तेथून बॅटरीने पाहिले असता त्यांना खोल्यांचे दरवाजे उघडे दिसले. यानंतर त्यांनी गावात लोकप्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यात ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनोज पाटील यांच्याशी संपर्क झाला असता ते तात्काळ त्या ठिकाणी पोहचले व शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीने संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी शाळेत प्रवेश करून खोल्या पहिल्या प्राथमिक पाहणीत दरवाजांची तोडफोड करून शालेय दस्ताऐवज इतरत्र केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सकाळी शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार, दीपक धनगर, प्रदीप पाटील, सरपंच जनार्दन पाटील, रवींद्र पवार, ग्राम. सदस्य मनोजआप्पा पाटील, नाना वेडू पाटील, राजेंद्र मराठे, मनोज पाटील सर, पोलीस पाटील संजय पाटील, गणेश पाटील, शाळा समिती अध्यक्ष संदीप पाटील, सदस्य जगदीश पाटील, विलास पाटील, असिफ सैय्यद कादर, अरब सैय्यद गफूर, अजाब पाटील, आदींनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ दखल घेत पीएसआय योगेश गणगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद शिंदे, पाचोरा डीबी भैय्यासाहेब बेहरे, भगवान चौधरी पोलीस हवालदार, सचिन निकम पोलीस नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. यात साधारण तीस हजार रुपये किमतीच्या दोन एलईडी टीव्ही चोरीस गेल्या असून वर्ग खोल्यांचे दरवाजे व इतर भौतिक सुविधांची तोडफोड केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासासाठी फिंगरप्रिंट टीम व श्वान पथकास पाचारण करून घटनास्थळाची कसून पाहणी करत चौकशी केली. यासंदर्भात भादविक ४५४, ४५७, ३८० नुसार अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.