सोयगाव–शेंदुर्णी रस्ता तात्काळ सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन — भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे यांचा इशारा
दत्तात्रय काटोले, सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव–शेंदूरणी हा मराठवाडा आणि खानदेशाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अक्षरशः खड्यांमध्ये हरवून गेला असून अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. रस्त्यावरून वाहन चालवणे तर दूरच, रस्ता ओळखूही न येण्याजोगा झाला आहे. दररोज होणारे अपघात, नागरिकांचे जीवितास धोके आणि प्रशासनाचे ढिमक्या गतीने सुरू असलेले काम या सर्व गोष्टींमुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे. “सोयगाव–शेंदूरणी रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास भाजपकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असे ते म्हणाले. हा रस्ता दोन्ही प्रदेशांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या जोडणारा कणा असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुमारे सात किलोमीटर लांबीच्या या मार्गातील तीन किलोमीटरचा भाग जळगाव जिल्ह्यात येतो.व तीन की. मी भाग छत्रपती संभाजी नगर मध्ये येतो हा तीन किमी रस्ता खूपच खराब झाला असून खड्याचा रस्ता रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही. पावसाळ्यात हेच खड्डे पाण्याने भरल्याने रस्ता मोठया खड्यच्या रूपांतरित होतो. परिणामी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाहनचालकांना पाठी व मणक्याच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, अगदी रुग्णवाहिकांनाही या मार्गाने रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गावंडे यांनी सोयगाव– शेंदुर्णी
रस्त्यासोबतच सोयगाव–पलासखेडा मार्गाचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. “हा प्रश्न केवळ विकासाचा नाही, तर जनतेच्या सुरक्षेचा आहे,” असे ते स्पष्ट म्हणाले.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच वसंत बनकर, राजेंद्र जावळे, माजी अध्यक्ष बद्री राठोड, खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी, मयुर मनगटे, प्रमोद पाटील, ता.उपाध्यक्ष विशाल गिरी, राजेंद्र म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून रस्ता कामाच्या प्रश्नावर आता परिस्थिती आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास जनआक्रोश तीव्र होण्याची शक्यता आहे.


























