पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश

पाचोरा (वार्ताहर) दि,२२ पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे ओढा कायम असून नुकताच पाचोरा तालुक्यातील नाइकनगर व आंबे वडगाव येथील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार गुलाबराव पाटील व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आ.किशोर अप्पा पाटील यांच्या ‘ शिवालय’ संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे पाचोरा तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड, नाईक नगर येथील भाजपचे माजी सरपंच गोपी चव्हाण व इतर कार्यकर्ते यांच्या पालकमंत्र्यांनी शिवसेनेचा भगवा रुमाल घालत पक्षात स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत शेतकरी आघाडीचे अरुण पाटील, डॉ धनराज पाटील,लोहाराचे उपसरपंच अक्षय जैस्वाल, सुभाष राठोड, श्रीराम राठोड जगन चव्हाण, रामकृष्ण मोची, गुरुदास चव्हाण यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपण भाजपा पक्षात काम करत असताना आपल्याला योग्य न्याय मिळू शकणार नाही, याची जाणीव झाल्याने व त्यामुळे पक्षात होणारी घुसमट लक्षात घेता आपण शिवसेनेची कास धरली असून आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात वंजारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याची प्रतिक्रिया विजय राठोड यांनी व्यक्त केली असून आ.किशोर अप्पा पाटील यांनी देखील पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखत त्यांचेवर लवकरच योग्य ती जबाबदारी देणार असल्याचे सूतोवाच दिल्याने वंजारा समाज बांधवात आनंद व्यक्त होत आहे.