
पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी: पारध परिसरातील दोन भावांचा पोलीस महासंचालक यांच्या हस्ते विशेष गौरव
पारध/प्रतिनिधी : महेंद्र बेराड
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या पारध शाहूराजे व धामणगाव परिसरातील दोन युवकांनी आपल्या शिक्षण, जिद्द आणि प्रामाणिक सेवाभावाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण परिसराचे, गावाचे आणि बारी समाजाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. दिनांक 01 मे 2026 रोजी मा.पोलीस महासंचालक यांच्या हस्ते दोघांनाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आल्याने हा क्षण संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे.
पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर पायघन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव धाड या छोट्याशा खेड्यातून साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या पायघन यांनी शिक्षणाच्या जोरावर आणि अथक परिश्रमांच्या बळावर पोलीस दलात मानाचे स्थान प्राप्त केले. कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि ध्येयवेडेपणा या गुणांमुळे त्यांनी सेवेत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, त्यांनी समाजात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ केली आहे. त्यामुळे ते आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
दरम्यान, जालना पोलीस दलातील श्री समाधान तेलंग्रे हे क्राईम ब्रँचमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून, त्यांनीही आपल्या कार्यतत्परतेने आणि धाडसाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुन्हे उकल करण्यात त्यांची कुशलता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.
या दोन्ही भावांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या यशामुळे पारध व धामणगाव परिसरातील युवकांना नवी दिशा मिळत असून, शिक्षण आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश त्यांनी दिला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून तसेच बारी समाज बांधवाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामस्थ व विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत तरुणांनीही त्यांच्या मार्गावर वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
























