दिशा अभियानांतर्गत उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचा सलग चौथ्यांदा गौरव
जळगाव प्रतिनिधी – मकरंद कुळकर्णी : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात दिशा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून उत्कर्ष मतिमंद विद्यालय, जळगाव यांचा सलग चौथ्यांदा सन्मान करण्यात आला. इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस, जळगाव संचलित या विद्यालयाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
दिशा अभियान हे दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मुंबई, आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय तसेच जय वकील फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2019 पासून राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून बौद्धिक अक्षम मुलांसाठी वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम (IEP) पोर्टलमार्फत प्रभावीपणे राबविण्यात येतो. यामध्ये अध्ययन-अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य, वर्कबुक्स, तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करणारे मॅन्युअल आणि नियोजनबद्ध वेळापत्रक यांसारख्या विविध घटकांचा उपयोग करण्यात येतो.
या प्रसंगी मा. श्री. सतिश बाळासाहेब धस (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. जळगाव), श्री. निलेश चव्हाण (राज्य समन्वयक, दिशा अभियान), श्री. भरत साळुंखे (जिल्हा समन्वयक, दिशा अभियान जळगाव) तसेच श्री. सुरसिंग जाधव (सहायक लेखाधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जळगाव) यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. संजय बोरसे सर व विशेष शिक्षक राहुल पाटील यांचा गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, उत्कर्ष मतिमंद विद्यालयाला दिशा अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
उत्कर्ष मतिमंद विद्यालयाने दिशा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कौशल्य विकासासाठी सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास विविध मान्यवर, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
















