उमेशच्या साहसामुळे जिल्ह्याच्या नवलौकिकात भर : ॲड. संदीप पाटील
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातर्फे गणपुर तालुका चोपडा येथील उमेश ऊर्फ ओम रवींद्र पाटील याने नदीपात्रात उडी मारून बुडणाऱ्या चार जणांचे प्राण वाचवल्याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चोपडा तालुक्यातील गणपूर गावाचे रहिवासी व शेतीकाम करणाऱ्या रविंद्र पाटील यांचा मुलगा व विकास माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी उमेश उर्फ ओम रविंद्र पाटील याला दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील अनेर नदीपात्रात चार युवक बुडताना आढळून आले. यावेळी ओमने क्षणाचाही विलंब न लावता तसेच मागचा-पुढचा विचार न करता व स्वतःची जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी मारून एक एक करत चारही जणांचे प्राण वाचवले. उमेशने केलेल्या या धाडसी व साहसी कर्तृत्वाचे सर्व जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड . संदीप सुरेश पाटील यांनी उमेशने केलेल्या या धाडसी कार्याचे अभिनंदन करतांना उमेशच्या पुढील शिक्षणास महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा तसेच दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय हातभार लावणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी उमेशचे अभिनंदन करताना ॲड. संदीप पाटील म्हणाले की, ‘उमेशच्या या कार्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडला असून या विद्यार्थ्याचे शौर्य आणि साहस इतरांना निश्चितच प्रेरणादायी आहे’.
यावेळी महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु. चंदना मनोज नेटके हिला विद्यापीठाकडून प्रथम शिक्षित विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच निरंजन बारेला या विद्यार्थ्यास राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार ॲड. संदीप सुरेश पाटील व डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, उमेशचे वडील रवींद्र पाटील, भाऊ, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, मनीष देसले, दीपक चौधरी, डॉ. एम. एल. भुसारे, डॉ. डी. डी. कर्दपवार, प्रा. चेतन बाविस्कर आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी व्यक्त केले.

















