अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन – सोयगाव येथे धार्मिक उत्साह
दत्तात्रय काटोले
सोयगाव : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सोयगाव येथील श्रीराम मंदिरात दि. २० मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात वै. ह.भ.प. नाईकदादा गुरुजी यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह आयोजित केला जात असून परिसरातील भाविक भक्तांसाठी ही एक मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, अखंड हरिनाम व विष्णू सहस्रनाम, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध भागातील नामवंत कीर्तनकार यावेळी उपस्थित राहून कीर्तन व प्रवचनाद्वारे भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.
दि. २१ मार्च रोजी श्री ह.भ.प. रविंद्रजी महाराज पेरेराव (सोयगाव) व श्री ह.भ.प. नारायण महाराज ढासाळेकर (जि. बुलढाणा), दि. २२ मार्च रोजी श्री ह.भ.प. जायेश महाराज वाघदुद (ता. यावल), दि. २३ मार्च रोजी श्री ह.भ.प. गिलादास चंद्रकांत महाराज (साकर, भुसावळ), दि. २४ मार्च रोजी श्री ह.भ.प. जिनेंद्र महाराज गादेकर (कावली, जि. छत्रपती संभाजीनगर), दि. २५ मार्च रोजी श्री ह.भ.प. नरेंद्र महाराज माळी (कोल्हे, ता. पाचोरा) यांची कीर्तने होणार आहेत.
दि. २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्री ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित (सोयगाव) यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे विशेष कीर्तन होणार आहे. तसेच दि. २७ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्री ह.भ.प. निवृत्ती महाराज मोहने (आमखेडा) यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होईल. या दिवशी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहादरम्यान विविध दिवसांमध्ये सकाळ व संध्याकाळच्या महाप्रसादासाठी अनेक भाविकांनी अन्नदाते म्हणून सहकार्य केले आहे. दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यात गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या धार्मिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री ह.भ.प. भागवत महाराज गादेकर व श्री ह.भ.प. रविंद्रजी महाराज पेरेराव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध मृदंगाचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम वादक आणि भजनी मंडळाचे सदस्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सदर सप्ताहाचे आयोजन श्रीराम मंदिर सोयगावचे श्री शंताराम दत्तात्रय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सोयगाव ग्रामस्थ व विविध भजनी मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
























