टरबुजाने मार खाल्ला अन् लिंबाने भाव खाल्ला
दत्तात्रय काटोले
सोयगाव (प्रतिनिधी) – तालुक्यासह परिसरात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना बाजारपेठेत पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. मात्र यंदा टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, टरबुजाला अत्यल्प दर मिळत आहे. उलट लिंबाच्या किमतींनी विक्रमी उसळी घेतल्याने “टरबुजाने मार खाल्ला अन् लिंबाने भाव खाल्ला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोयगाव, ककाळा, जरडी, निबायती, बहूलखेडा आदी परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी उन्हाळी अल्पकालीन पीक म्हणून टरबुजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. उत्पादनही भरघोस झाले. एकरी २० ते २५ टन उत्पादन निघाल्याने चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे.
सध्या व्यापारी शेतकऱ्यांकडून टरबुजाची खरेदी केवळ ५ ते ७ रुपये प्रति किलो दराने करीत आहेत. बाजारात किरकोळ विक्रीत १० ते १५ रुपये दर असला तरी वाहतूक खर्च (सुमारे ३ रुपये प्रति किलो) वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी रक्कम उरते. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
शेतकरी विनोद तांडे यांनी सांगितले की, “टरबुजाची लागवड करून नफा तर सोडाच, पण मुद्दलही निघत नाही. मेहनत व खर्च वाया जात आहे.”
दरम्यान, दुसरीकडे लिंबाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजारात एका लिंबासाठी ५ ते १० रुपये मोजावे लागत असून, मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिक लिंबूपाणी, सरबत यांना प्राधान्य देत असल्याने लिंबाच्या दरात वाढ झाली आहे.
खरबूज ३० ते ४० रुपये किलो, अंगूर १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री होत असून, टरबुज मात्र स्वस्तात मिळत आहे. तसेच बाजारात आंब्याची आवक सुरू झाली असली तरी दर जास्त असल्याने मागणी मर्यादित आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती व बाहेरील राज्यांतून येणाऱ्या टरबुजामुळे स्थानिक बाजारावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी टरबुजाचे दर घसरले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
























