रमजानचा उपवास हा संयम, परोपकार आणि मानवी सहानुभूतीची आठवण करून देतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा:
“रमजान महिन्यातील उपवास (रोजा) आपल्याला संयम, सदाचार, इतरांबद्दल प्रेम, बंधुभाव आणि मानवी सहानुभूतीची शिकवण देतात,” असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे आयोजित ‘रमजानचे नन्हे रोजेदार’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून तो सामाजिक एकता मजबूत करण्याचा आणि लोकांना जोडण्याचे एक साधन आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून विविध जाती-धर्माचे लोक एकाच व्यासपीठावर येतात, ज्यामुळे सामाजिक सलोखा वाढीस लागतो.
हा कार्यक्रम ‘शिक्षक सेना पाचोरा’ आणि ‘जिल्हा परिषद उर्दू शाळा व्यवस्थापन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख जावेद रहीम यांनी केले.
बाल रोजेदारांचा सत्कार: इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या अशा ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा, ज्यांनी रमजानचे सर्व उपवास पूर्ण केले होते, त्यांचा सत्कार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व सरपंच करण काटकर यांच्या वतीने प्रत्येक बाल रोजेदाराला ५०० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आमदारांनी स्वतः आपल्या हाताने मुलांना इफ्तार (उपवास सोडणे) करवला.
रावसाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात परिसरात शांतता, बंधुभाव, एकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या सोहळ्याला तहसीलदार विजय बनसोडे, सरपंच करण काटकर, साहेबराव चौधरी, महेंद्र बापू, विजय ठाकूर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख वसीम, उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम, अन्सार शेख, मोहसीन शेख, उमर बेग, मुशताक खान, नासिर मणियार, सय्यद इमरान अली, मजहर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक अजहर शेख, नवीदा अंसारी, शेख जावेद रहीम, रिजवान शेख, खलील शेख आणि सना अंसारी यांनी परिश्रम घेतले. गावातील हिंदू-मुस्लिम बांधव, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात आणि देशपातळीवर शांतता व एकात्मतेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.























