राहुरी – बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे पडघम वाजले,२३ एप्रिल ला ईव्हीएम वर मतदान,४ मे ला मतमोजणी 
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र विधानसभेत रिक्त झालेल्या दोन जागेवर मतदान घेण्याची घोषणा निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. अजित दादा पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.तर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले साहेब हे विजयी झाले होते.बारामतीची निवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या साठी बिनविरोध होईल परंतु राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र चुरशीची लढत होईल असे वातावरण निर्माण झाले आहे.स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात ही लढाई अटीतटीची होईल.असा अंदाज आहे. परंतु प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या उठलेल्या वावड्या मुळे राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तनपुरे यांना विधानसभा आणि कर्डिले यांना विधान परिषद असे चित्र राहुरी विधानसभा मतदारसंघात निर्माण करण्यात आले आहे. तनपुरे भाजपात आले तर कर्डिले तनपुरे यांच्या एका म्यानात दोन तलवारी कशा राहतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.अक्षय कर्डिले यांना जरी सहानुभूती असली तरी त्यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नाही ही खरी वस्तुस्थिती आहे.ते साधे ग्रामपंचायत सदस्य सुध्दा नाहीत. मग थेट आमदार कसं करावं हा पक्षश्रेष्ठींना निश्चितच प्रश्न पडलेला आहे.तर तनपुरे हे मामांच्या आशिर्वादाने का होईना थेट उर्जा राज्यमंत्री झालेले आहेत.तनपुरे यांची मतदार संघावर असलेली पकड पाहता भाजपवर नामुष्कीची वेळ येवू नये म्हणून तनपुरे यांना आत्ताच पक्षात घेऊन उमेदवारी बहाल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.तनपुरे जरी म्हणतात की मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात आहे.पण आतून भाजपशी चाललेली हातमिळवणी ही लपून राहिलेली नाही.कर्डीले+ तनपुरे हे एकदा एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहून राजकीय निरीक्षकांनी आपले अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. नामदार विखे पाटील यांनी आतापर्यंत कोणत्याही नेत्याला “नाकापेक्षा मोती जड “होउ दिले नाही. जे आपल्या पक्षात राहतील ते आपल्याला वरचढ होता कामा नये हे त्यांचे आता पर्यंतचे राजकीय धोरणात्मक समीकरण राहीलेले आहे. खरं पाहता विखे पाटील यांचा राहुरी मतदार संघावर सुरूवाती पासूनच डोळा होता.स्व.शिवाजीराव कर्डिले यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष करून त्या बदल्यात राहुरी विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी विखे पाटील यांनी जीवाचा आटापिटा केला परंतु शिवाजी रावांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.आणि आमदारकीचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेतले होते. शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा मतदार संघावर दबदबा होता.आणि पकड मजबूत होती. पण आज तसे चित्र पहावयास मिळत नाही. उलट तनपुरे यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात घेऊन आपणच या मतदारसंघात किंग मेकर आहोत हे आवर्जून सीद्ध केलेले आहे. भाजपच्या अंतर्गत गोटातून वरीष्ठ पातळीवर असा अहवाल सादर करण्यात आला आहे की राहुरीत भाजप पिछाडीवर आहे.त्यामुळे तेथे पारंगत उमेदवार पाहिजे.म्हणजे सुजय विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्री विखे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.त्यामुळे सुजय विखे पाटील यांना दुसऱ्या राज्यात प्रभारी म्हणून पाठवून दिले आहे. राहुरीत तनपुरे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर भाजप पिछाडीवर जाणार नाही. उलट तनपुरे विजय खेचून आणतील ही खात्री झालेली आहे.पोट निवडणूकीत तनपुरे विजयी झाले की पुढील तिनं वर्षे उलटली की विखेच राहुरी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार असतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीची अधिसूचना ३० मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे.६ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल.७ एप्रिल रोजी छाननी होईल.आणि ९ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.२३ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी मत मोजणी होईल अशी रूपरेषा ठरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न शिल आहेत. पण राहुरी च्या आमदारकीचा तीढा कसा सोडवायचा प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे.शेवटी विखे पाटील हेच किंग मेकर ची भुमिका बजावणाऱ्या पैकी एक आहेत हे आगामी निवडणुकीत पहावयास मिळणार आहे.

























