सोयगाव येथील जि.प. केंद्रीय शाळेत ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँके’चे उद्घाटन
सोयगाव तालुका प्रतिनिधी दत्तात्रय काटोले
सोयगाव : विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी यांच्या प्रेरणेने तसेच गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन तिरूपती अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास देसाई यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत गायकवाड, उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष रविंद्र काळे, सदस्य व नगरसेवक हर्षल (बंटी) काळे, शिक्षणप्रेमी व समाजसेवक राजेंद्र दुतोडे, प्रशालेचे अध्यक्ष सुनील ठोंबरे, तसेच दुर्गाबाई निकुंभ, रविंद्र साखळे, रामेश्वर शिरसाठ, वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या बँकेप्रमाणेच सर्व व्यवहार विद्यार्थी स्वतः करत आहेत. शाळेने छापील बँक चेक, रक्कम काढण्यासाठी विड्रॉल स्लिप, भरणा स्लिप, नोंदवही व आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शाळेच्या आवारातच स्वतंत्र बँक सुरू असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे.
या व्यवहारात विद्यार्थी कॅशिअर, लिपिक व व्यवस्थापक म्हणून काम पाहत असून पैसे मोजणे, नोंद करणे, चेक तपासणे, जमा–खर्चाची नोंद घेणे अशी कामे जबाबदारीने पार पाडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बँकेतील प्रत्यक्ष व्यवहार, आर्थिक शिस्त व पैशांचे महत्त्व याची जाणीव होत आहे. या विद्यार्थी बचत बँकेत कॅशिअर म्हणून सृष्टी अण्णा वाघ, लिपिक म्हणून शुभ्रा दत्तात्रय सोहनी, व्यवस्थापक म्हणून प्राची नितीन सोनवणे तर सहाय्यक म्हणून लावण्या किशोर खैरे यांनी जबाबदारी सांभाळली.
या उपक्रमामागे शाळेचे कृतिशील व दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक किरण कुमार पाटील यांची संकल्पना व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमास पंकज रगडे, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, सुरेखा चौधरी, प्रतिभा कोळी, गणेश बाविस्कर, बिलाल बागवान आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक’ हा उपक्रम ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाला व्यवहारिकतेची जोड देणारा असून, इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी.
























