शिक्षणसंस्था चालवणे अवघड काम! – जळगाव दौऱ्यादरम्यान आ. तांबे यांनी व्यक्त केली भावना

शिक्षणसंस्था चालवणे अवघड काम!
– जळगाव दौऱ्यादरम्यान आ. तांबे यांनी व्यक्त केली भावना
– शिक्षकांच्या समस्या जाणून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

प्रतिनिधी, जळगाव

 

कोणत्याही शिक्षणसंस्थेला सरकारकडून पगाराव्यतिरिक्त कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. अगदी नव्या खुर्चीपासून ते वर्गातल्या फळ्यापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी शिक्षणसंस्थेला स्वत: पैसे उभे करावे लागतात. त्यामुळे शिक्षणसंस्था चालवणं अत्यंत अवघड काम असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. जळगाव दौऱ्यावर असलेल्या आ. तांबे यांनी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंदाळे महिला महाविद्यालायात भेट देत तेथील शिक्षकांशी व संस्थाचालकांशी संवाद साधला. या वेळी शिक्षकांनीही आपल्या विविध समस्या आ. सत्यजीत तांबे यांच्या कानांवर घातल्या.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून सातत्याने पाचही जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन दौरे करणारे आ. सत्यजीत तांबे सध्या जळगाव जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील तसेच युवा शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. या दरम्यान त्यांनी बेंदाळे महिला महाविद्यालयातील शिक्षकांची भेट घेतली. प्रत्येक शिक्षणसंस्थेला आर्थिक चणचण भेडसावते. सरकार फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम देते. मात्र इतर खर्चांसाठी संस्थेला धडपड करावी लागते. अशा वेळी शिक्षणसंस्थांना मदत करणाऱ्या बँकांच्या छोट्या-छोट्या योजना तपासून त्या योजनांचा लाभ घ्यावा लागतो. तुम्हीही HDFC, ICICI, स्टेट बँक अशा बँकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या बँका शिक्षकांना व संस्थेला कोणत्या सुविधा देतील, हे विचारलं पाहिजे, असा सल्लाही आ. तांबे यांनी दिला.

देशाचं भविष्य घडवणारे हात
शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात. ही पिढीच देशाचं भविष्य असते. त्यामुळे एका अर्थाने शिक्षक हे देशाचं भविष्य घडवणारे हात आहेत. पण या हातांना सरकारी योजनांची वेगवेगळी कामं दिली जातात. त्यामुळे सरकारी कामं आणि विद्यादान अशी कसरत शिक्षकांना करावी लागते. तरीही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं. शिक्षक समाधानी असेल, तरच तो विद्यार्थ्यांना शिकवू शकेल आणि त्यांचं भविष्य घडवू शकेल. गुगलच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची खाण्यापासून ते त्यांचे कपडे धुण्यापर्यंतच्या अशा अनेक सोयीसुविधा आहेत. गुगलचे म्हणणे आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामावेळी कामावरच लक्ष केंद्रीत केले पाहिजे. ही भावना शिक्षण क्षेत्रात येणे गरजेची आहे, अशी भावनाही आ. तांबे यांनी व्यक्त केली.

तुमचे प्रश्न मार्गी लागतील
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने शिक्षक पदवीधर आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या वडिलांना देखील ३ वेळा मतदारसंघात निवडून देण्याचे काम आपण केले आहे. माझ्या वडिलांचे आणि या संस्थेचे ऋणानुबंध जपण्याचा मी प्रयत्न करेन. त्या दृष्टीनेच जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार बँकेतून होत नव्हते. जिल्ह्यातील बँका काही सुविधा देऊच शकत नव्हत्या. त्याबद्दलचा जीआर काढून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी केला. त्याचप्रमाणे शिक्षक भरती, जुनी पेन्शन योजना असे अनेक शिक्षकांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील. – आ. सत्यजीत तांबे