मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव तालुक्यात शाखांचे उदघाटन : ठिकठिकाणी भव्य स्वागत

भडगाव, दिनांक १३ (प्रतिनिधी ) : सध्या शेतकर्‍यांसह सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देतांना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्या भडगाव तालुक्यातील शिवसेना शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. शाखा उदघाटनाच्या प्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते भडगाव तालुक्यातील कजगाव-वाडे गटातल्या विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचे उदघाटन करण्यात आले. यात बुधवारी सायंकाळी माळगाव, तांदलवाडी, उंबरखेड, भोरटेक, कजगाव, पासर्डी, वडगाव बुद्रुक, वाक या गावांमध्ये शाखा सुरू करण्यात आल्या.

यात ठिकठिकाणी वैशालीताई सुर्यवंशी यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईच्या जोडीला महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. यात माळगाव येथे तर शाखा उदघाटनाच्या जोडीला वैशालीताईंसह अन्य मान्यवरांच्या सत्काराचे देखील आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई म्हणाल्या की, तात्यासाहेबांच्या पाठीशी आपण ज्या प्रकारे उभे राहिले, अगदी त्याच प्रकारे आता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांनी सर्वांसाठी केलेले काम हे लक्षणीय असून याची जाण आपल्याला ठेवण्याची गरज आहे.

वैशालीताई सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, सध्या देशभरात जे काही सुरू आहे ते पाहता शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे जगणे खूप कठीण झालेले आहे. आपले होत असलेले हाल हे मतदान करतांना लक्षात ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा. मी पुढे विधानसभेसाठी मतदानाला तर येणारच आहे, पण याआधी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-उबाठा पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून जिंकवून देण्याचे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले.

याप्रसंगी वैशालीताई यांच्यासोबत शिवसेना-उबाठा पक्षाच्या जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील,
दिपक पाटील, शंकर मारवाड़ी, जे के पाटील, प्रशांत पवार, योजना ताई , माधव जगताप, चेतन पाटील, गोरख दादा, विजय साळूखे, रविन्द्र पाटील, रतन दादा, दत्तू मांडोले, नवल परदेशी, भुषन पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि ठिकठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.