शासकीय हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्याची तातडीची मागणी — तहसीलदारांना तालुका खरेदी-विक्री संघाचे निवेदन

शासकीय हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्याची तातडीची मागणी — तहसीलदारांना तालुका खरेदी-विक्री संघाचे निवेदन

 

तालुका प्रतिनिधी ॥ अलीकडील अतिवृष्टीतून शेतकऱ्यांचा मका पिकाचा काही भाग वाचवण्यात यश आले असले तरी सध्या व्यापाऱ्यांकडून बाजारात अत्यंत कमी दराने मका खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तत्काळ हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी तातडीची मागणी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक मयूर मनगटे, मंगेश सोहनी आणि कृषिभूषण अरुण सोहनी यांनी केली आहे.

 

या संदर्भात त्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले असून त्यात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांनी अतोनात परिश्रम करून वाचवलेला मका सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

मनगटे, सोहनी व अरुण सोहनी यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाल्यास त्यांचे उत्पादन योग्य किमतीत विकता येईल आणि त्यांचे नुकसान टळेल. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.