कोपरे येथे मळगंगा देवी यात्रेनिमित्त कलशारोहण समारंभ संपन्न

कोपरे येथे मळगंगा देवी यात्रेनिमित्त कलशारोहण समारंभ संपन्न

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) मळगंगा देवी ही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे या देवीचे मुख्य मंदिर आहे.पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे ही ग्रामस्थांच्या सहकार्याने या देवीचे मोठे मंदिर बांधण्यात आले आहे.चैत्र पौर्णिमे नंतर येणाऱ्या मंगळवारी या देवीची गावातील सवाष्णींच्या हस्ते वाजत गाजत पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून महापूजा केली जाते.गावातील सासरी गेलेल्या सुवासिनी या दिवशी आवर्जून देवीच्या दर्शनासाठी आणि आपल्या नवसपुर्ती साठी माहेरी येतात.आणि भक्ती भावाने देवीची खणा नारळाचे ओटी भरतात.याच दिवशी रात्री मळगंगा देवीच्या काठीची आणि पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते.फटाक्यांची आतषबाजी आणि देवीच्या जयघोषाच्या गजरात गावातील प्रमुख रस्त्यांवरुन ही छबिना मिरवणूक काढण्यात येते.गावातील सर्व अबाल व्रुद्ध या मिरवणुकीत सहभागी होतात.दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी मारुती मंदिरा समोर कलाकारांचा हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गावातील यात्रा कमेटीच्या वतीने सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात येतो.पंचक्रोषीतील अनेक नामवंत पैलवान या हगाम्यात कुस्तीची आपली कला दाखवून चितपट कुस्ती स्पर्धा जिंकतात.मळगंगा देवी मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.परीसरातील सर्व भाविक भक्तांनी या यात्रेत सहभागी होउन देवीच्या दर्शनाला येताना देवीच्या मंदिर बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मळगंगा देवी यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.ही यात्रा दि.३० एप्रिल आणि १ मे रोजी होत आहे.