सोयगाव तालुक्यात पावसाचा कहर — शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान

सोयगाव तालुक्यात पावसाचा कहर — शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान

 

तीन दिवसांपासून पावसाचा हल्ला; शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी!

 

दत्तात्रय काटोले

 

 

सोयगाव, ता. २६ (प्रतिनिधी) —

सोयगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा- शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आकांक्षांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. रविवारी दुपारी पुन्हा एकदा आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

पावसासोबत आलेल्या वाऱ्याच्या झोक्यांनी सोयगाव शहरासह परिसरातील शेतीत हाहाकार माजवला आहे. मका, कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाजीपाला या पिकांवर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतेच कापणी केलेले मका व सोयाबीन शेतात साठवून ठेवले होते; परंतु अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे ते सर्व भिजून नुकसानग्रस्त झाले आहे.

काही ठिकाणी शेतातील मकाच्या कंसाला, व कपाशीच्या बोंडाला कोम येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दरम्यान, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, भुईमूग लागवडीची तयारी सुरू केली होती. अनेकांनी शेतात रोटावेटर मारण्याची तयारी केली होती; परंतु सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीचे काम पुढील दोन ते चार दिवस थांबण्याची शक्यता आहे. परिणामी रब्बी हंगामातील पेरणी उशिरा होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रविवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाऊस कायम होता. जर हीच स्थिती रात्रभर टिकली, तर परिसरातील नाल्यांना आणि नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

शेतकऱ्यांचे आधीच अवकाळी पावसामुळे डळमळीत झालेले आर्थिक समीकरण आता अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.