महिलांमध्ये उस्मानाबाद तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरला सुवर्णपदक

महिलांमध्ये उस्मानाबाद तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरला सुवर्णपदक

राज्य खो-खो स्पर्धा :

जळगाव : महाराष्ट्र क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र खो -खो असोसिएशन यांच्या सहकार्याने जळगांव येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात महिला गटात उस्मानाबादने ठाणेचा तर मुंबई उपनगर ने पुणेचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.
जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खो-खो स्पर्धेत महिला गटात उस्मानाबादने ठाणेचा 1 गुणांनी पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात उस्मानाबादच्या अश्विनी शिंदे (3.00, 3.20 मि. संरक्षण व 1 गुण), संपदा मोरे (1.30, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण ), सुहानी धोत्रे (1.20 मि. संरक्षण व 4 गुण ), तन्वी भोसले (1.10, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाची कामगिरी केली. ठाणेकडून किशोरी मोकाशी (1.50, 2.10 मि. संरक्षण), शीतल भोर (2.00, 2.10 मि. संरक्षण ), कल्याणी कंक (3 गुण ) यांनी चांगला खेळ केला, पण पराभव टाळता आला नाही.
पुरुष गटात मुंबई उपनगर संघाने पुण्याचा 1 गुण व 0.50 मिनिटे राखून (17-16) विजय मिळवला. वेगवान आक्रमण आणि तेवढ्याच शांतपणे केलेले संरक्षण यामुळे हा विजय मिळवता आला. विजयी संघातर्फे अनिकेत पोटे (1.10, 1.20 मिनिटे व 3 गुण), ओमकार सोनवणे (1.20, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण), निहार दुबळे (1.20 मि. संरक्षण व 4 गुण ), ऋषिकेश मुरचावडे (1.20 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. पुण्याकडून राहुल मंडळ (1.10, 2.00 मि. संरक्षण व 2 गुण ), प्रतिक वाईकर (1.50, 1.30 मि. संरक्षण व 4 गुण), सुयश गरगटे (1.30, 1.00 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. मात्र पराभव टाळता आला नाही.
पारितोषिक वितरण जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार,भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंदजी शर्मा,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,माजी सचिव संदीप तावडे,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ,प्रशांत इनामदार,प्रा.राजेश सोनवणे,गांधाली पलांडे,कमलाकर कोळी,पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर,स्पर्धेचे तांत्रिक संचालक प्रा.डॉ.नरेंद्र कुंदर,खो-खो मार्गदर्शक तथा माजी राष्ट्रीय खेळाडू गुरुदत्त चव्हाण,माजी राष्ट्रीय खेळाडू गुड्डू अहिरराव,राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत वीर अभिमन्यु पुरस्कारप्राप्त पंढरीनाथ बडगुजर,क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी,मार्क धरमाई,संजय माहिरे,सुजाता गुल्हाणे,मिनल थोरात यांच्या हस्ते झाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,क्रीडा अधिकारी तथा माजी राष्ट्रीय खेळाडू गुरुदत्त चव्हाण,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील,दिलीप चौधरी,दत्तात्रय महाजन,अनिल माकडे,सुशांत जाधव,प्रेमचंद चौधरी व इतर आजी-माजी खेळाडूंनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत यांनी केले तर सुत्रसंचालन सुजाता गुल्हाणे यांनी व आभार जयांशु पोळ यांनी मानले.