नगरदेवळा येथे ‘वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला’ कार्यक्रमाचे आयोजन
पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे शनिवारी “वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला” (ते पैगंबरांमध्ये ‘कृपा’ पदवी मिळवणारे) या शीर्षकाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
याप्रसंगी, विद्यार्थ्यांनी नअत-ए-पाक (स्तुतीपर कविता) आणि भाषणांच्या माध्यमातून पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनातील पैलू अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणुकीचे पालन करून ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरदेवळा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अफरोज शेख यांनी भूषवले. मुख्याध्यापक अजहर शेख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. शेख जावेद रहीम यांनी कार्यक्रमाचा हेतू आणि उद्दिष्ट स्पष्ट केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
शेख अफरोज रहीम व मुश्ताक खान यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर देत शिक्षकांना उपक्रमांद्वारे शिक्षण देण्याचे आवाहन केले. सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक केले आणि आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, नविदा बानो, जावेद रहीम, रिजवान शेख, खलील शेख, दिलारा सय्यदा, सना अन्सारी यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उमर बेग, मुश्ताक खान, शोएब अन्सारी, वसीम शेख आणि इतर प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते. शेख जावेद रहीम यांनी आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
‘आनंददायी शनिवार’ असल्याने या दिवशी खेळ-खेळात आणि आनंदाई वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.