“फोटो काढा, पुढारी… पण मदत कुठंय?”

प्रतिनिधी | दत्तात्रय काटोले, सोयगाव
राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या पदरात फक्त नुकसानच उरले आहे. मराठवाड्यासह अनेक भागात कापूस, तूर, मका, सोयाबीन, नागवेली चे पानमळे, केळी, मोसंबी, यांसारखी उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत. पाणी साचल्याने शेतातच नव्हे तर घराघरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या ‘फोटोशूट दौऱ्या’ मात्र धडाक्यात सुरू आहेत.
नेते फक्त फोटोसाठी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर दौरे सुरू केले आहेत. मात्र हे दौरे ‘मदतीचे’ नसून ‘फोटोशूटचे’ असल्याची टीका शेतकरी वर्गातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दोन फोटो काढायचे, ते फेसबुक-इंस्टाग्रामवर टाकायचे आणि निघून जायचं – एवढाच ‘सेवा भाव’ सध्या नेत्यांमध्ये दिसून येतो आहे.
“मदत कुठंय?” – शेतकऱ्यांचा आक्रोश
पावसामुळे नुकसान झाल्याचे पंचनामे व्हावेत म्हणून अनेक शेतकरी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. मात्र अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. याउलट कोणी मोठा राजकीय नेता गावात आला, तर त्याच्या मागे पंचनामे करणारे अधिकारी हजर! सामान्य शेतकऱ्याला मात्र दुर्लक्षित केलं जातं आहे. ही स्थिती पाहता, “पंचनाम्याऐवजी फोटोशूटच महत्त्वाचं आहे का?”असा सवाल उपस्थित होतो.
सणासुदीचा काळ… पण घरात काळोख
दसरा, दिवाळीसारखे सण उंबरठ्यावर आले असतानाही शेतकऱ्यांच्या घरी मात्र सण नाही, संकट आहे. अनेकांनी फुलशेती करून चांगला दर मिळेल, कर्ज फेडू आणि मुलाबाळांचे लग्न करू, अशी आशा ठेवली होती. मात्र पावसाने फुलशेतीसुद्धा उद्ध्वस्त केली. सोयगाव तालुक्यातील झंडू प्रकरणात तब्बल दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
“नुसती स्वप्न पाहिली… पण निसर्गाने आणि शासनाने दोघांनीही पाठ फिरवली,” अशी भावना किशोर फुसे आणि भगवान रघुनाथ राऊत (गट नं. 104, गलवाडा शिवार) यांनी व्यक्त केली.
राजकारण थांबवा, मदतीला उभे राहा
शेतकऱ्यांचे घर उद्ध्वस्त झाले, शेती नष्ट झाली, कर्जबाजारीपणा वाढला आहे – हे वास्तव डोळ्यासमोर असतानाही नेते फोटोसाठीच गावात फिरताना दिसत आहेत.
“मदतीचे जाहीर आश्वासन सोडून प्रत्यक्षात काहीच नाही,” असा सूर सर्वसामान्यांतून ऐकायला मिळतो आहे.
शेवटचा सवाल – पुढारी, फोटो पुरे झाले… आता कृती कधी?
शासनाकडून तात्काळ मदत, नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि प्रभावी पंचनाम्यांची गरज आहे.

























