गट नोंद दुरुस्तीच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण, खासदार कल्याण काळेंच्या हस्ते शेवट
सोयगाव (प्रतिनिधी) – पळाशी (ता. सोयगाव) येथील वयोवृद्ध शेतकरी गोरखनाथ यादव कऱ्हाळे यांनी वारसाहक्कानुसार फेरनोंद घेण्याच्या मागणीसाठी सोयगाव तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. गुरुवारपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले.
गोरखनाथ कऱ्हाळे यांची मागणी होती की, वारसा हक्काने फेर घेताना गट क्रमांकांच्या अदलाबदलीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच इतर काही प्रशासनाकडून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी.
दरम्यान, जालना – छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ. कल्याणराव काळे हे नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले असता, त्यांनी उपोषणस्थळी जाऊन गोरखनाथ कऱ्हाळे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी तहसीलदार मनीषा मेने यांना त्वरित योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, तहसीलदारांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर उपोषण लिंबूपाणी देऊन समाप्त करण्यात आले.
या प्रसंगी खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, शहराध्यक्ष दिनेश हजारी, रवि काटोले, ज्ञानेश्वर ईवरे, रवि काळे, युवराज वामने, एकनाथ गोंड, अर्जुन ढगे, भारत पगारे, रामदास पवार, काशिनाथ बडक, ज्ञानेश्वर गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोयगाव : तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी गोरखनाथ कऱ्हाळे यांचे उपोषण लिंबूपाणी देऊन सोडविताना खासदार डॉ. कल्याण काळे, राजेंद्र राठोड, राजेंद्र काळे व इतर.

















