चोपडा महाविद्यालयात ‘गुरू गौरव सोहळा’ व ‘पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न’

चोपडा महाविद्यालयात ‘गुरू गौरव सोहळा’ व ‘पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न’

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दि.१३ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यापरिषदेच्या सदस्यपदी राज्यपाल महोदयांच्या तर्फे नियुक्ती करण्यात आली त्यानिमित्ताने ‘गुरू गौरव सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना.अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै. ना. दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील, कुसुंबा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.टी.पी.शिंदे, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी, सौ. भारती सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल बाविस्कर यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी लिखीत ‘Functional English’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इंग्रजी विभाग प्रमुख डी.एस.पाटील यांनी या पुस्तकाचा धावता आढावा घेतला तसेच परिचय करून दिला.

याप्रसंगी प्रा.टी.पी.शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील व माजी शिक्षणमंत्री कै. अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांनी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा, कार्याचा, शैक्षणिक प्रवासाचा परिचय करून दिला. यावेळी प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या शालेय जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे, अनुभवांचे कथन केले. यावेळी ते म्हणाले की, ‘प्रत्येक काम मनापासून करा. त्या कामात आनंद माना आपले जीवन सुखकर होईल. आयुष्यात प्रत्येकाने समाजोपयोगी संशोधन करायला हवे. जगावेगळे कार्य करून स्वतःची प्रतिमा व ओळख निर्माण करायला हवी’.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘कोणतेही पद सांभाळताना कौशल्ये हवे. प्राध्यापकांनी विविध विषयांवर लेखन व संशोधन करायला हवे’. यावेळी त्यांनी पुस्तक प्रकाशन झाले व विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांचे कौतुक व अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आर.आर. पाटील यांनी केले तर आभार सौ.पी.एन.दाभाडे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती सदस्य व प्रमुख यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू -भगिनी यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, नातेवाईक, आप्तेष्ट, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.