नवजीवन विद्यालय पाचोरा येथे नागपंचमीनिमित्त सर्प विज्ञान कार्यक्रम संपन्न
नागपंचमीची औचित्य साधत नवजीवन विद्यालय पाचोरा येथे सर्प विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवजीवन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक रवींद्र चौधरी सर यांनी सापांविषयी असलेले गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी सापांन विषयी सखोल माहिती देत जगात सापांच्या ३७७१ जाती असून त्यापैकी २८० जाती या विषारी व निम्न विषारी प्रकारच्या आहेत. भारतात केवळ ५२ जातीचे विषारी साप आहेत. त्यापैकी ४० जाती या समुद्रात आढळतात व उर्वरित बारा विषारी जातीचे साप जमिनीवर आढळतात. त्यापैकी आपल्या परिसरात आपल्या घराच्या आजूबाजूला केवळ चारच विषारी जातीचे साप आढळतात. त्यामध्ये नाग, घोणस, फुरसे व मण्यार यांचा समावेश होतो. सापांचे अन्न उंदीर, बेडूक, पाली, सरडे इत्यादी आहेत. सापांचे विष दोन प्रकारचे असते न्यूरो टॉक्सीक व हिमोटॉक्सिक.
साप चावल्यावर प्रथम उपचार करताना साप चावल्याच्या जागेपासून हृदयाकडे जाणाऱ्या बाजूला आवळपट्टी घट्ट बांधावी. कोणत्याही धारदार वस्तूने चावलेल्या ठिकाणी इजा करू नये. सापांविषयी असणारे गैरसमज दूर करत सापांना कान नसतात त्यामुळे त्यांना ऐकू येत नाही. तसेच साप दूध पितो हे चूक आहे दूध हे सापाचे अन्न नाही, साप डुक धरत नाही,
नागाच्या डोक्यावर कोणताही नागमणी नसतो, नाग संपत्तीचे रक्षण करत नाही, कोणत्याही जातीचा साप गाय किंवा म्हशीचे पाय बांधून दूध पीत नाही, मेलेल्या सापावर रॉकेल टाकल्यास साप जिवंत होतो हा गैरसमज आहे. तसेच मांडळ साप हा गुप्तधन मिळवण्यासाठी उपयुक्त आहे, गांडूळ या सापाला दोन तोंड असतात हेही चुकीचे आहे त्याचा शेपटीचा आकार आणि तोंडाचा आकार सारखा असतो.
त्यासोबतच साप चाऊच नये यासाठी घेतले जाणारे उपाय सांगत शेतकऱ्यांनी नेहमी गवतात काम करताना पायात लांब बूट असणे आवश्यक आहे, गवतात काम करत असताना मोठ्या काठीने आधी जमिनीवर काठी आपटून आवाज करावा जेणेकरून गवतात लपलेला साप पळून जाईल, जंगलातून जाताना डोक्यावर टोपी असणे आवश्यक आहे, आपल्या घराच्या जवळपास दगड, विटा, लाकूड यासारख्या वस्तूंचा ढीग करू नये, घराच्या भिंतीला पडलेल्या भेगा बुजून घ्याव्यात आधी प्रकारचे काळजी घ्यावी.
सापाचे प्रमुख अन्न उंदीर आहे. त्यामुळे साप पर्यावरणचे रक्षण करतो. म्हणून साप वाचवा पर्यावरण वाचवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.