शेतकऱ्यांना विकासोमुख कर्ज वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय — आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेरही विकासोमुख कर्ज वाटप करता यावे, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर राज्य शासनाच्या सहकार विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. १४ जुलै २०२५ रोजी ही बैठक घेण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता ती मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, विधान भवन, मुंबई येथील दालन क्रमांक ३०२ (ई) येथे आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र सहकार विभागाने आमदार किशोर पाटील यांना दिले आहे.
या बैठकीस विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, सहकार आयुक्त कार्यालय, विभागीय सहसंचालक, तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेरही विकासोमुख कर्ज वितरित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना केवळ जिल्ह्याच्या मर्यादेत न राहता, जिथे त्यांची शेती आहे त्या जिल्ह्याबाहेरही कर्जाचा लाभ घेता येणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होणार आहे.
ही बैठक पार पडल्यानंतर विकासोमुख कर्ज वाटपाच्या संदर्भातील अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी आमदार किशोर पाटील यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय आहे.

























