गोराडखेडा येथील विद्यार्थ्यांची एसएससी परीक्षेत बाजी “नवजीवन विद्यालयातर्फे गुणवंतांचा सत्कार”
येथील विद्यार्थ्यांनी एसएससी मार्च २०२५ परीक्षेत बाजी मारली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी असतात या भावनेला आपल्या उज्वल यशातून छेद दिला आहे. विद्यालयातील गुणतालिकेत गुरु इंद्रभान पाटील याने ९०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे, कृष्णा आबा पाटील याने ८७.४०% गुण मिळवत विद्यालयात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर सौरभ दशरथ पाटील या विद्यार्थ्यांने ८२% गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील पहिल्या पाच क्रमांकात आपले स्थान निश्चित केल्याने गोराडखेडा येथील विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या अगोदरही सलग चार वर्ष विक्रम करत गोराडखेडा येथील विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्च २०२५ परीक्षेत घवघवीत यश मिळवत या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी पर्यंत गोराडखडा येथील जि प मराठी शाळेत शिक्षण घेत पुढील शिक्षणासाठी पाचोरा येथील नवजीवन विद्यालयात सेमी वर्गासाठी प्रवेश घेतला. विद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे व मातापत्यांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची अभ्यासा प्रति चिकाटी व परिश्रमाचा योग्य संयोग घडून विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवत आपल्यासह कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मातापित्यांचा सत्कार करून पेढे भरविण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे पर्यवेक्षक आर वाय चौधरी, इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक एस ए पाटील, उपशिक्षक तथा माजी नगरसेवक विकास पाटील, कलाशिक्षक जे व्ही पाटील, विद्यालयातील सहशिक्षक तथा गोराडखेडा ग्राम. सदस्य मनोज पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थीचा सहकुटुंब सत्कार करत अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विद्यार्थ्यांनी व कुटुंबाने योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्याप्रतीची आस्था याबद्दल विद्यालयाचे व शिक्षकांचे आभार मानले.