सावर ग…! स्वतःला आणि… भारतीय संस्कृतीला…!!
काय ग मावशी …या वर्षी तुझा महिला दिन इतक्या शांततेत कसा ?….नाही…ग म्हणजे दरवर्षाप्रमाणे या वर्षी काही लेख….महिलांच्या आत्मसन्माना विषयी तुझ्या काही सहानुभूती पूर्वक प्रतिक्रिया …यापैकी काहीच नाही….म्हणून विचारलं ? काय ग…? पुण्यातील वेताळ टेकडीवर घडलेल्या घटनेचा निषेध तर, नाही ना पाळलास तू …?? धनश्री ने जरा मिश्किलपणेच मला प्रश्न केला.
आणि धनश्रीच्या या प्रश्नाने माझ्या मनात खरोखरच आजच्या महिला वर्गाविषयी तिरस्कार निर्माण झाला.. अर्थात हा तिरस्कार निर्माण होण्यास आपणही तितकेच जबाबदार आहोत हे ही खरे…
असो…सर्वच स्रिया या *तिरस्कार* शब्दास जबाबदार आहेत असेही नाही… पण समाजातील काही मूठभर स्रिया या खरोखरच या घृणास्पद विशेषणाला लायक आहेत….आणि याच मूठभर महिलांचे अनुकरण या तरुण वर्गातील बुद्धी ने अनमॅच्युअर्ड असणाऱ्या मुली निर्लज्जपणे करण्यास तयार होतात ….आता तर यात व्यसनाधीनता, नशा आणणारे पदार्थ,सिगारेट, आमली पदार्थांचे सेवन,आणि काय काय…. या गोष्टींची देखील भर पडली आहे.तेव्हा अक्षरशः शरीराची नासधूस होईपर्यंत घाणेरड्या सवयीचें अंगिकरण करण्यापर्यंत मुलींची मजल गेली आहे …असे म्हणण्यास हरकत नाही, आणि या बाबी म्हणजे यासारख्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात आजच्या पिढीला फॅशन वाटते…! या अशा व्यसनाधीनतेमुळेच पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या शहरात जवळपास साडे चार हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज चा साठा सापडतो आहे…मग याला कारणीभूत कोण….??
शेवटी कस आहे ना, आपण आपल्या आदर्श असणाऱ्या …. माँ साहेब जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला,रमाई आंबरडकर,राणी लक्ष्मीबाई,…..इ अशा कितीही कर्तृत्ववान महिलांची उदा. दिली ना , तरी स्वच्छ पांढरा कापड पाहण्यापेक्षा त्यावरील छोटासा काळा डाग पाहण्याची आजची समाजाची मनस्थिती झालेली आहे ….!
एवढेच काय, तर सध्या अगदी अल्पवयीन मुल- मुली पळून जाऊन लग्न करतात… व पोलिसांसमोर जन्मदात्या आई वडिलांना म्हणतात की,” आम्ही यांना ओळखत नाही”. या घटना तर सर्रास कानी येऊ लागल्या आहेत, तेव्हा त्या जन्मदात्या आई वडिलांच्या मनाला काय वाटेल ? असा विचारही न करणाऱ्या या पिढीला असे वागणे म्हणजे स्वतःला सिद्ध केल्यासारखे वाटते…!!
थोडक्यात काय तर,आज समस्त महिला वर्गाने महिला सबलीकरणाच्या नावाखाली *स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार* ही जी महिला मुक्ती ची व्याख्या करून ठेवली आहे ना.. तीच मुळात चुकीची आहे …खरं तर महिलांना चूल- मुलं च्या कचाट्यातून बाहेर यावं…तिला वैचारिक स्वातंत्र्य, शिक्षणाचं स्वातंत्र्य असावं, विचार मांडण्याच स्वातंत्र्य असावं …तिचा आत्मसन्मान जपला जावा …इ अनेक बाबतीत महिलांच्या हिताचाच विचार करून आजपर्यंत अनेक समाजसुधारकांनी अतोनात प्रयत्न केले.आणि स्रियांना पारंपरिक चौकटीतून बाहेर काढलं , पण…आज काही महिला मात्र त्याच स्वातंत्र्याचा *स्वैराचार* असा उलट अर्थी वापर करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी नको त्या ठिकाणी धाडस दाखवून, पुरुषी अहंकाराला थोपटण्यासाठी स्त्रीत्वाला लाजवेल अशा गोष्टींचा अंगीकार करून आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत … आणि नाहक त्यात स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. आणि आता तर व्हाट्सअप च्या माध्यमातून सुद्धा पती- पत्नीचे विनोद आणि त्यातही पत्नीकडून पतीची,सासूची केली जाणारी अवहेलना … यामुळे आपण काहीतरी श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो ,मग खरोखरच .. समाज या महिलांकडे सन्मानाने ,आदराने पाहिल का…? तर मुळीच नाही. खर तर स्त्री ही परमेश्वराने निर्माण केलेली एक अप्रतिम कलाकृती आहे….नवनिर्मिती चे सामर्थ्य असणारी स्त्री ही प्रसंगी रणरागिणी होऊन सर्व काही संपुष्टात देखील आणू शकते…. पण तिने तिच्या ह्या सामर्थ्याचा, शक्तीचा वापर विधायकतेसाठी केला तर… !
खरं तर जेव्हा एक महिला …ही आदर्श मुलगी, आदर्श बहीण, आदर्श पत्नी, आदर्श सून आदर्श आई या भूमिकेतून जाते तेव्हाच ती कर्तृत्ववान महिला म्हटली जाते…या *आदर्श* या पदवीसाठी प्रसंगी तिला अनेक अग्नीपरीक्षांना समोर देखील जावं लागत.घर- परिवार,नोकरी ,नातेवाईक, सण समारंभ, इ…सर्व सांभाळून तारेवरची कसरत करून धाडसाने आणि जिद्दीने ती *आदर्श* ही पदवी संपादन करते, तेव्हा तो त्या महिलेसाठी खरा जगातील महिला दिन असतो…
केवळ सांसारिक जबाबदाऱ्या सोडून बाहेर हिंडणे, गेटटूगेदर ,पार्ट्या यांच्या नावाखाली सतत घराबाहेर असणे ,हॉटेल वरून जेवण मागावणे …समाजात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अब्रूचे धिंडवडे काढणे…. यात कसला आलाय मोठेपणा…?
मी म्हणते *अंगावर फेकलेल्या शेण, माती, दगड ,गोट्यांचा पाया रचून शिक्षणाची इमारत बांधणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे आपण वंशज आहोत हा विसर आम्हाला का पडतो….??* याचा अर्थ असा नाही की आपणही सावित्रीबाईन सारखा अन्याय सहन करावा…, पण स्वतःचे चारित्र्य सांभाळून , सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवूनही आत्मसन्मान,प्रतिष्ठा मिळवता येते याचे ज्वलंत उदा.म्हणजे माझी साऊ….!! हे सतत ध्यानात असू द्यावे….
खरं तर ज्या दिवशी आपण मुलांना सात च्या आत घरात चे महत्त्व पटवून देणे, घरी बनवलेल्या ( सुसंस्कारित) जेवणाचे महत्त्व पटवून देणे,सायंकाळी देवासमोर बसून रामरक्षा आणि शुभं करोती चे महत्त्व सांगणे,घरातील वयोवृद्धांची सेवा व काळजी समजावून देणे…वाचनाचे महत्त्व पटवून देणे,आध्यात्मिक विषयांवर चर्चा करणे, हिंदू धर्माची ओळख,धर्मग्रंथ,संत परंपरेची ओळख इ विषयक माहिती इ…. या विषयी जेव्हा स्वआचरणातून व शिकवणुकीतून जगासमोर येऊ तेव्हा तो खरा जागतिक महिला दिन ठरणार आहे.असे मला वाटते….
असो, तेव्हा या महिला दिनाच्या निमित्ताने आपण प्रतिज्ञा बद्ध होऊया की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा विचार समूळ नष्ट करून आम्ही संस्कारक्षम पिढी घडवूनच स्वतःला सिद्ध करून दाखवू…
आणि खरचं सांगू सखींनो, बंधनात खरोखर सौंदर्य असते …सागराला किनाऱ्याचे बंधन आहे म्हणून सागर सुंदर आहे… ,श्री रामांच्या आचरणात सुद्धा मर्यादा होत्या ,म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम नावाने नावलोकला आले…
तेव्हा आपणही स्वतःला सुसंस्काराच्या बंधनात बांधुया आणि सुसंस्कृत पिढी पर्यायाने सुराज्य निर्मितीच्या कार्यात खारीचा वाटा उचलूया …
श्रीमती योगिता वसंत ठाकूर
श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर पाचोरा जि. जळगाव