अंगणवाडी कर्मचारी 4 मार्चपासून बेमुदत उपोषणचा इशारा

अंगणवाडी कर्मचारी दिनांक 4 मार्चपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पाचोरा प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचा-यांचे महत्वाची प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासुन प्रलंबित आहेत, त्यांवर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी दिनांक 4 मार्चपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे,

पाचोरा प्रकल्प कार्यालयाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या श्रीमती जिजा राठोड ह्या आपल्या कामामध्ये सततपणे दुर्लक्ष करीत असून उडवाउडवीचे तसेच बेजबाबदारपणाचे उत्तरे देतात. त्यामुळे पाचोरा प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष आहे. म्हणून त्यांच्याकडुन बालविकास प्रकल्प अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार काढण्यात यावा अशी संघटनेची आग्रही मागणी आहे.

यासह पाचोरा प्रकल्पा अंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. सदर अडचणीबाबत संघटनेने प्रकल्प कार्यालय तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याशी वेळोवेळी तोंडी व लेखी चर्चा झालेली आहे. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वरील अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे. म्हणून अंगणवाडी कर्मचा-यांच्या वरील अडचणी सोडविण्यात याव्यात यासाठी पाचोरा प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी दिनांक ०४ मार्च २०२४ पासुन जिल्हा परिषदसमोर अडचणी सुटेपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे,
पाचोरा प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या वरील अडचणी सोडवुन जबाबदार असणाऱ्या श्री. दिनेश पाटील व श्रीमती जिजा राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. निवेदनात म्हटले आहे की,

पाचोरा प्रकल्पांतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये सुमारे ५० ते ५५ अंगणवाडी मदतनिसांची भरती झालेली आहे. परंतु प्रकल्प कार्यालयाने नवीन भरती झालेल्या मदतनिसांची माहिती पो. एफ.एम.एस. मध्ये अद्ययावत न भरल्यामुळे त्यांना सप्टेंबर २०२३ पासुन आजतागायत मानधन अदा झालेले नाही. परिणामी सदर मदतनिसांची उपासमार होत आहे. म्हणून याला जबाबदार असलेल्या श्री. दिनेश पाटील व श्रीमती जिजा राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

वरखेडी, ता. पाचोरा येथील मदतनिस श्रीमती मंगलबाई गणपत पाटील यांचे कोरोना होऊन दि. २७/ ०८/२०२० रोजी निधन झालेले आहे. शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोव्हिड-१९ मुळे मृत्यु झाल्यास वारसांना ५० लाख रुपयांचे विमा कवच लागू केलेले होते. त्यानुसार श्रीमती मंगलबाई पाटील यांचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आलेला आहे. परंतु प्रस्तावामधील त्रुटी दुर करण्यासंदर्भात वेळोवेळी आपल्या कार्यालयाकडून तसेच संघटनेकडून प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा

केलेला आहे. परंतु प्रकल्प कार्यालयाने त्रुटी दूर करण्यासंदर्भात आजतागायत याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही,

श्रीमती उषा हरंचद लोधी, अंगणवाडी सेविका, शिंदाड, श्रीमती कमल पाटील, अंगणवाडी मदतनिस, नगरदेवळा, ता. पाचोरा यांना प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे सन २०२२ ची भाऊबीजेची रक्कम आजतागायत अदा झालेलो नाही. याबाबत संघटनेने पाठपुरावा केला असता प्रकल्प कार्यालयाकडुन उडवाउडवीची तसेच बेजबाबदारपणाची उत्तरे मिळत आहेत. श्रीमतो लोधी व श्रीमती पाटील यांना सन २०२२ ची भाऊबीज देण्याबाबत प्रकल्प कार्यालयाला ताबडतोबीने आदेशित करावे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. ७ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता सदर संप दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी मागे घेऊन दिनांक २६ जानेवारी २०२४ पासुन अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. परंतु प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची हजेरी दिनांक २६ जानेवारी पासुन भरली नाही. म्हणून त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. दिनांक २६ जानेवारी २०२४ पासुन हजेरी नोंदवून मानधन अदा करण्याबाबत प्रकल्प कार्यालयाला आदेशित करावे. तसेच अंगणवाडी कर्मचा-यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या श्री. दिनेश पाटील व श्रीमती जिजा राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

शासन आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन २०२३ मध्ये २०००/- रुपये प्रत्येकी भाऊबीज देण्याबाबत आदेशित केले होते. परंतु प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आजतागायत भाऊबीजेची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही, म्हणून अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये प्रकल्प कार्यालयाबद्दल प्रचंड नाराजी आहे.