पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा! आ. सत्यजीत तांबेंचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!
आ. सत्यजीत तांबेंचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे
मंत्री, खासदार व आमदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

प्रतिनिधी, मुंबई

नाशिक, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमधील लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी लावून ठेवला असून हा मार्ग पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावा, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या रेल्वेमार्गावर येणाऱ्या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधींना पत्र लिहीत आ. तांबे यांनी त्यांनाही या मागणीसाठी आवाज उठवण्याची विनंती केली आहे. रेल्वेमार्गासारखे प्रकल्प अनेक वर्षांतून एकदाच होतात. ते होताना या प्रकल्पाचा फायदा या भागातील जास्तीत जास्त लोकांना मिळावा, यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत मिळेल त्या व्यासपीठावरून ही मागणी करण्याची गरज आहे, असंही आ. तांबे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डीमार्गे गेल्याने सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणराव, मंचर, चाकण या भागातील लोकांचं मोठं नुकसान होणार आहे. या भागातून पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण, नोकरी किंवा उद्योगधंदे यासाठी लोक जातात. पुणे व नाशिक या जिल्ह्यांमधील चाकण, भोसरी, मुसळगाव आणि सिन्नर या चार औद्योगिक वसाहतीदेखील याच मार्गावर आहेत. अशाप्रकारचे मोठे प्रकल्प अनेक वर्षांतून एकदाच होतात. त्यामुळे हा प्रकल्प होतानाच तो शिर्डीऐवजी पूर्वनियोजनाप्रमाणे व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्राद्वारे केले आहे.

अहमदनगर-पुणे हा रेल्वेमार्ग दौंडमार्गे असल्याने रस्तेमार्गाने नगर-पुणे हे अंतर गाठायला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा दुप्पट वेळ रेल्वेमार्गाने लागतो. परिणामी, या अहमदनगर-पुणे रेल्वेचा कोणताही फायदा अहमदनगर किंवा पुणे जिल्ह्यातील नागरिकांना होताना दिसत नाही. त्यामुळे अहमदनगर ते पुणे रेल्वेमार्ग हा सरळमार्गाने असावा, ही नगरकरांची जुनी मागणी होती. हीच चुक नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत घडण्याची शक्यता आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग फक्त नावापुरता नाशिक-पुणे राहील, पण या रेल्वेचा कोणताही फायदा सिन्नर, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, चाकण, मंचर या भागातील लोकांना मिळणार नाही, अशीही भावना आ. सत्यजीत तांबेंनी पत्राद्वारे व्यक्त केली.

चौकट

कोणाकोणाला लिहिलं पत्र?

सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे आदी लोकप्रतिनिधींना आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रव्यवहार केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी आपापल्या स्तरावर नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा मुद्दा उचलून लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ करून द्यावा, अशी मागणी आ. तांबेंनी केली.

‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा, यासाठी आपण आत्ताच आपले राजकीय वजन वापरून प्रयत्न करावे, आपण सर्वांनी जागं होऊन एकत्र येत या विरोधात लढा दिला, तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकेल. तरी, लोकप्रतिनिधींनी सर्व व्यासपीठांवर हा मुद्दा मांडत या मार्गासाठी संघर्ष करावा.
– आमदार, सत्यजीत तांबे.