शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरवदिन उत्साहात

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरवदिन उत्साहात

पाचोरा: – येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित “शिंदे इंटरनॅशनल स्कूल” मध्ये आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष नीरजभाई मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील, शिंदे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पाटील मंचावर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषेचे महत्त्व सांगून कार्यक्रमाचे औचित्य स्पष्ट केले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांना नुकत्याच मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल शिंदे शाळेत त्यांना गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात स्नेहल पाटील, ऋषी बनसोडे, देवयानी वाडेकर, पूर्वी देशमुख, अक्षदा झवर, समीक्षा गावंडे व प्राची लोढा या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी अस्खलित मराठी भाषेत अत्यंत जोरदार मनोगते व्यक्त केलीत.

नीरज मुणोत यांनी मराठी भाषेचा गोडवा व्यक्त करणाऱ्या दोन कविता सादर करत मराठी भाषेचे सौंदर्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेचा गौरव करणारा एवढा सुंदर कार्यक्रम झाल्याचे समाधान प्रा. शिवाजी शिंदे यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मराठीतून कथा,कविता, प्रसंग लेखन लिहिण्याचे आवाहन केले. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची प्रतिमा स्वतः रेखाटून पूजेसाठी ठेवल्याबद्दल विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश गायकवाड यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अक्षदा झंवर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग, तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.