उत्तर महाराष्ट्रातील मनपा, नपा व ग्रामपंचायतीसाठी एकदिवसीय कार्यशाळा

उत्तर महाराष्ट्रातील मनपा, नपा व ग्रामपंचायतीसाठी एकदिवसीय कार्यशाळा
– एकदिवसीय चर्चासत्रातून उलगडणार विकासाचे विविध पैलू
– जयहिंद लोकचळवळ व प्रजा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
– विकास आराखडा, कचरा व्यवस्थापन, व आर्थिक नियोजन या विषयांवर चर्चा

प्रतिनिधी, नाशिक

जयहिंद लोकचळवळ, प्रजा फाऊंडेशन व महापालिका प्रशासनाचे संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सस्टेनेबल अर्बन फ्युचर्स’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील ताज गेटवे हॉटेल येथे १० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पार पडेल. विकास आराखडा, कचरा व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन या तीन विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील मनपा, नपा व ग्रामपंचायतीसाठी ही एकदिवसीय कार्यशाळा आहे. चांगली व मजबूत अर्थव्यवस्था, सुधारित नियोजनातून स्थानिक सरकारे निर्माण करणे व भविष्यातील धोरण सुलभ करणे इत्यादी विषयावर सखोल चर्चा केली जाईल, अशी माहिती जयहिंद लोकचळवळीचे संघटक व आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

नाशिकमध्ये होणाऱ्या एकदिवसीय चर्चासत्रातील पहिले सत्र विकास आराखडा या विषयावर होईल. या सत्रात विकास आराखड्याची प्रक्रिया, नियोजन समित्यांची भूमिका, प्रभाग स्तरावरील अमलबजावणी या महत्त्वाच्या पैलूंवर सखोल चर्चा होईल. याव्यतिरिक्त, गतिशीलता आणि मुलभूत आव्हाने स्थानिक सरकार कशा प्रकारे हाताळू शकतात. संसाधनांचा वापर कशा करू शकतो. तसेच, मोकळ्या जागांचा योग्य वापर कसा करू शकतो, हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

शहरी भागात कचरा व्यवस्थापन हा विषय खूप कळीचा मुद्दा असतो. याचाच विचार करून या कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात कचरा व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञ आपापले विचार मांडतील. या सत्रात घन कचरा आणि सांडपाणी यांचे व्यवस्थापन, कचऱ्यावरील आणि सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पांची प्रभावी हाताळणी, कचऱ्याचे नियोजन आदी गोष्टींबाबत चर्चा होईल, अशी माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

कोणत्याही शहराच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक नियोजन हा महत्त्वाचा घटक असतो. या चर्चासत्रातील तिसऱ्या सत्रात आर्थिक नियोजन या विषयावर सखोल चर्चा होईल. यात महसूल निर्मिती आणि खर्चाचा ताळेबंद राखण्यासाठी आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करता येईल, शहरी भाग आर्थिक नियोजनाच्या बाबतीत स्वतंत्र आणि स्वायत्त कसे होतील, अशा विविध पैलूंचा विचार या सत्रात केला जाईल.

या तीनही सत्रांमध्ये शहरांच्या शाश्वत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून शाश्वत विकासाचे विविध उपाय समोर येणार आहेत. प्रजा फाऊंडेशन यांच्यासह आयोजित केलेल्या या एकदिवसीय चर्चासत्रासाठी अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूट/ अर्बन रिसर्च फाउंडेशन, असाद वारसी, रविकांत जोशी व इतर तज्ज्ञ नॉलेज पार्टनर आहेत.