१८ व्या वयात घ्यावे लागतात ‘हे दोन निर्णय’- स्व. बी. पी. पाटील कॉलेजमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान- आ. सत्यजीत तांबेंनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

१८ व्या वयात घ्यावे लागतात ‘हे दोन निर्णय’- स्व. बी. पी. पाटील कॉलेजमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान- आ. सत्यजीत तांबेंनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत नाहीत, ही खरी वस्तुस्थिती आहे. तरी देखील ग्रामीण विद्यार्थ्यांला भविष्यात ‘कुठे जायचं हे कळलं’ तोच खरा हुशार विद्यार्थी आहे. तसेच भविष्यात येणारा काळ हा खूप वेगवान आणि स्पर्धात्मक असणार आहे. या काळाच्या ओघात तुम्हाला स्वतःला टिकून राहायचं आहे. हीच खरी मोठी कसोटी ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबेंनी केले.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित स्व. बी. पी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सत्यजीत तांबे बोलत होते.

सत्यजीत तांबे म्हणाले की, आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. शिक्षण घेणं हे पूर्वीपेक्षा खूप सोप्प झालं आहे. आयुष्यात काय करायचं आहे, हा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला १८ व्या वर्षी स्वतःच्या आयुष्यासंदर्भात आणि देशाच्या भविष्याचा निर्णय घ्यावा लागतो. तोच पल्ला आता जवळ आलेला आहे. ह्याच वर्षी तुम्हाला करिअर विषयी योग्य मार्ग निवडावा लागतो. तसेच १८ व्या वर्षी तुम्हाला संविधानानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे तरुणांनी मतदान करावे आणि चांगला व योग्य लोकप्रतिनिधी निवडून द्यावा.