प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी सजली पाचोरा नगरी- भाजपा तर्फे विविध पद्धतीने सजावट भाजपाचे अमोल शिंदे यांचे तर्फे विविध उपक्रम

प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी सजली पाचोरा नगरी- भाजपा तर्फे विविध पद्धतीने सजावट भाजपाचे अमोल शिंदे यांचे तर्फे विविध उपक्रम

पाचोरा –
उद्या दिनांक 22 जानेवारी सोमवार रोजी अयोध्या येथील भव्य राम मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोरा नगरी सजविण्यात आली आहे. रामलल्लाचा संस्मरणीय प्राणप्रतिष्ठा समारोह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. येथील रस्ते दुभाजकावर केशरी कापडाच्या भव्य पताका व झेंडे लावून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी कटआउट लावल्यामुळे भडगाव रोड परिसराचे सौंदर्य वाढले आहे.
पाचोरा शहरातील विविध चौकात प्रशस्त श्रीराम पूजन स्थळ (प्लॅटफॉर्म / मंडप)उभारले आहेत.प्रत्येक चौकात प्रभू श्रीरामांचे कटआउट व मंदिराची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. दि. 22 रोजी दिवसभर शहरातील भाविक भक्तांना या ठिकाणी येऊन प्रभूश्रीराम व मंदिराचे पूजन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
तसेच शहरातील एकूण 28 मंदिरांमध्ये होणाऱ्या महाआरतीच्या वेळी पाचोरा भाजपा तर्फे 11 हजार रामकूट प्रसाद पॅकेट वाटप करण्यात येणार आहेत.या संपूर्ण उपक्रमांसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवा देणार आहेत

*रांगोळी उपक्रम विशेष उल्लेखनीय*
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात 35 बाय 45 फूट आकाराची रांगोळी काढण्यात आली आहे. प्रभू श्रीरामचंद्र व राममंदिर प्रदर्शित करणाऱ्या या रांगोळीच्या निर्माणासाठी 120 किलोग्रॅम रांगोळी व अन्य घटकांचा वापर करण्यात आला आहे. गालीचा , पोर्ट्रेट व कॅलिग्राफी अशा मिश्र प्रकाराच्या या रांगोळीसाठी 13 कलाकारांनी सतत 50 तास परिश्रम घेतले आहेत. शिंदे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुवर्णा पाटील ,श्रेयस सोनपूरकर व स्वाती महाजन यांचेसह 13 कलाकारांचे कौतुक होत आहे. शहरातील सर्व श्रीराम भक्तांनी आपापल्या नजीकच्या चौकात जाऊन प्रभू श्रीरामाचे पूजन करावे, विविध मंदिरांमध्ये महाआरतीला उपस्थिती देऊन श्रीरामकुट प्रसादाचे ग्रहण करावे व रांगोळीतून साकारलेल्या श्रीरामलल्लाचे व मंदिराचे दर्शन घ्यावे. असे आवाहन अमोलभाऊ शिंदे यांनी केले आहे.