पाचोरा येथील सुपुत्र सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) श्री. याऊद्दीन खाटीक यांना डीजीपी मेडल जाहीर
पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) श्री. याऊद्दीन खाटीक यांना उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून देण्यात येणारे प्रतिष्ठेचे डीजीपी मेडल जाहीर झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण पाचोरा तालुका व परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. खाटीक यांनी आपल्या सेवाकाळात गुप्तवार्ता विभागात अत्यंत जबाबदारीने काम करत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. गुन्हे प्रतिबंध, माहिती संकलन व संवेदनशील परिस्थितींमध्ये योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे त्यांनी पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत झाली आहे.
पोलीस महासंचालक पदक हे राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना दिले जाणारे अत्यंत मानाचे सन्मानचिन्ह मानले जाते. या सन्मानामुळे श्री. खाटीक यांच्या कार्याचा गौरव झाला असून त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “आपल्या सारख्या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
श्री. याऊद्दीन खाटीक यांच्या या यशामुळे पाचोरा तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























