साखरपुड्यासाठी गेले अन् निकाह करून परतले
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा खुर्द या छोट्याशा गावाने समाजसुधारणा, परस्पर सहकार्य आणि हुंडाबळीसारख्या अनिष्ट प्रथेला फाटा देत समाजासमोर एक आदर्श उदाहरण सादर केले आहे.
गोराडखेडा येथील रहिवासी अनवर नईम खान यांचा साखरपुडा (वाङनिश्चय) बुधवारी जळगाव तालुक्यातील अवाना येथील फिजा बी अकील शेख यांच्याशी होणार होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सर्व मंडळी उपस्थित होती. लग्नाची तारीख ठरवताना, मुलीच्या वडिलांनी हुंड्याची रक्कम आणि इतर खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी मुलगा पक्षाकडे दोन महिन्यांचा वेळ मागितला.
हे पाहून उपस्थित असलेले प्रतिष्ठित नागरिक शेख अलीम यांनी सर्वांना समजावून सांगितले की, “निकाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणावरही कर्जाचा डोंगर न चढवता व्हायला हवा.” त्यांनी हुंडा न घेता निकाह करण्याचे आवाहन केले आणि मुलाकडच्या मंडळींचे मन वळवले. मुलीच्या कुटुंबीयांनीही हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला.
अशाप्रकारे, केवळ साखरपुड्यासाठी गेलेली मंडळी हुंडामुक्त आणि साध्या पद्धतीने निकाह लावून घरी परतली. शेख अलीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले हे उदाहरण इतर तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल आणि येणारी पिढी हुंडा प्रथेला विरोध करून साध्या निकाहचा अवलंब करेल, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी असगर सय्यद, सादिक सय्यद कादर, मुबीन सय्यद रौफ, मुश्ताक सय्यद, आसिफ सय्यद, अयुब खान, रौफ सय्यद, अलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
























