Home पाचोरा तालुका नगर देवळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘इस्तिक्बाल-ए-रमजान’ कार्यक्रम उत्साहात साजरा

नगर देवळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘इस्तिक्बाल-ए-रमजान’ कार्यक्रम उत्साहात साजरा

नगर देवळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘इस्तिक्बाल-ए-रमजान’ कार्यक्रम उत्साहात साजरा

 

जिल्हा परिषद उर्दू शाळा नगर देवळा (ता. पाचोरा) येथे ‘इस्तिक्बाल-ए-रमजान’ (रमजानचे स्वागत) या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण, हम्द आणि नात-ए-पाकने झाली. शाळेतील मुला-मुलींनी रमजानच्या स्वागतावर आधारित गीते सादर केली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्देश शेख जावेद रहीम यांनी मांडले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गरीब नवाज मशीद, नगरदेवळा येथील खतीब व इमाम इन्साफ रजा साहेब उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून पत्रकार अमीन शाह उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात इन्साफ रजा साहेब म्हणाले की

“रोजा ठेवण्याचा उद्देश फक्त उपाशी राहणे नसून त्याद्वारे ‘तकवा’ (ईशभीती व संयम) प्राप्त करणे हा आहे. रोझ्यातील भूक आणि तहान आपल्याला आठवण करून देते की जगात अनेक गरीब, अनाथ, विधवा आणि असहाय्य लोक आहेत ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. रोझा आपल्याला त्यांच्या गरिबीची जाणीव करून देऊन मदतीची भावना निर्माण करतो.”

 

त्यांनी पुढे सांगितले की, या पवित्र महिन्यात आपण आपल्या शेजाऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला सर्व प्रकारच्या वाईट कृत्यांपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांनी रोजाचे धार्मिक फायद्यांसोबतच शास्त्रीय (वैज्ञानिक) फायदेही विद्यार्थ्यांसमोर मांडले. मोठ्या संख्येने रोझा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून परिसराच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी प्रार्थना केली.

 

 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सय्यद इमरान अली, उमर बेग, मुश्ताक खान, अशफाक मजीद, उमरेन सय्यद आणि मुस्तफा सय्यद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अजहरुद्दीन शेख, रिजवान शेख, खलील शेख, जावेद रहीम, नविदा अन्सारी आणि सना अन्सारी यांनी परिश्रम घेतले.

 

कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा दिवस ‘स्वच्छता मोहीम’ म्हणून साजरा करत आपल्या वर्गांची आणि मैदानाची साफसफाई केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले.

Don`t copy text!